Nepal Bury Unidentified Flood Victims protocol : नेपाळमध्ये आलेल्या महाभयंकर पुरामुळे अनेकजणांचे प्राण गेले आहेत. अनेकजण बेपत्ता असून सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटण्यास अडचणी येत आहेत. परंतु, मृतदेह फारवेळ ठेवता येणार नसल्याने त्यांना पुरण्यास सुरुवात होणार आहे. मृतदेह कुजल्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बुधवारी सकाळी आलेल्या या भीषण पुरानंतर आतापर्यंत किमान ७३४ मृतदेह हाती आले आहेत. भारताच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण नेपाळमधील चितवन जिल्ह्यात सर्वाधिक २३३ मृतदेह सापडले आहेत. रुग्णालयांमध्ये पुरेशी जागा आणि सुविधा नसल्यामुळे हे मृतदेह सुरक्षित ठेवणे चितवन प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरलं होतं. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या संसर्गाच्या इशाऱ्यानंतर शनिवारी प्रशासनाने मृतदेह पुरण्याचा निर्णय घेतला आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितलं, “मृतदेहांची संख्या वाढल्याने आम्ही एका घराचा वापर ‘कूलिंग सेंटर’ म्हणून केला होता. मात्र, तिथेही जागा संपल्याने आमच्याकडे मृतदेह पुरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही.”

मृतदेहांचे डीएनए (DNA) नमुने गोळा

भविष्यात ओळख पटवणं सोपं व्हावं यासाठी मृतदेह पुरण्यापूर्वी अधिकारी प्रत्येक मृतदेहाचे डीएनए नमुने आणि ओळख क्रमांक (आयडेंटिफिकेशन नंबर) गोळा करत आहेत. प्रत्येक मृतदेहाला एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आणि लोकेशन टॅग दिला जात आहे, जेणेकरून डीएनए मॅच झाल्यावर नातेवाईक तो मृतदेह बाहेर काढू शकतील. शनिवारी दुपारपर्यंत १०० हून अधिक मृतदेहांचे डीएनए प्रोफाइलिंग पूर्ण झाले होते.

१.५ मीटर खोल खड्डे

भविष्यात मृतदेह बाहेर काढणं सोपं जावं यासाठी १.५ मीटर खोल खड्डे खणले जात आहेत. दोन मृतदेहांमध्ये ४० सेंटीमीटरचे अंतर ठेवले जात आहे, जेणेकरून ओळख पटलेला विशिष्ट मृतदेहच बाहेर काढता येईल. मृतदेह क्रमांकासह बॅगमध्ये पॅक केले जात असून, दफनभूमीच्या ठिकाणी प्रत्येक मृतदेहाच्या क्रमांकाचा साइनबोर्ड आणि काँक्रीटचा चबुतरा बांधला जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ, फोटोग्राफी आणि जिओ-टॅगिंग (Geo-tagging) द्वारे दस्तऐवजीकरण केले जात आहे.

आपल्या बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेणाऱ्या लोकांना देशातील विविध रुग्णालयांमध्ये डीएनए नमुने द्यावे लागणार आहेत. चाचणीचा निकाल आल्यानंतर आरोग्य विभाग या नमुन्यांची मृतदेहांच्या डीएनएशी पडताळणी करेल. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने संबंधित क्रमांकाचा मृतदेह शोधून तो बाहेर काढला जाईल आणि नातेवाईकांच्या स्वाधीन केला जाईल.

पोलिसांनी या अनोळखी मृतदेहांची माहिती एका वेबसाईटवरही अपलोड केली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये अद्याप शेकडो परदेशी नागरिकांसह सुमारे २,५०० लोक बेपत्ता आहेत.