Nepal flash floods : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून ४१ सुरक्षा कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. बेपत्ता कर्मचाऱ्यांमध्ये नेपाळ पोलिसांचे ३२ आणि सशस्त्र पोलिस दलाचे ९ जवान आहेत. त्याचबरोबर २९१ परदेशी नागरिक बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. याबद्दल सविस्तर वृत्त न्यूज१८ ने दिले आहे.
भोटे कोशी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने तिबेट सीमेजवळील तिमुरे आणि स्याफ्रु बेसी परिसराला मोठा फटका बसला. पुराच्या वेगवान प्रवाहात अनेक वाहने आणि स्थानिक भाग वाहून गेले. रस्ते आणि पूल तसेच जलविद्युत प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनेमुळे किती नुकसान झाले आहे याचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही.
२९१ परदेशी नागरिक बेपत्ता
नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, पुरामुळे २९१ परदेशी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी किमान १०५ भारतीय पर्यटक असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असून, पुरामुळे बाधित भागांमध्ये मदत आणि बचावकार्याला वेग देण्यात आला आहे.
बेपत्ता सुरक्षा कर्मचाऱ्यांचा शोध सुरू
पुरामुळे प्रभावित भागात मोठ्या प्रमाणावर बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरक्षा दलांकडून पूरग्रस्त वस्त्या, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या परिसरात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी सांगितले की, पोलीस आणि लष्करी जवानांसह आपत्कालीन पथके बाधित भागात पाठवण्यात आली आहेत. खालच्या भागात नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
भोटे कोशी नदीकाठच्या वस्त्यांमधील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना, नदीकाठच्या लोकांनी विशेष खबरदारी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
चीनमधील ग्यारोंग बंदरावरही परिणाम
नेपाळमधील या मुसळधार पुरानंतर चीनच्या बाजूला असलेल्या ग्यारोंग बंदरालाही याचा मोठा फटका बसला आहे. वृत्तसंस्था शिन्हुआच्या माहितीनुसार, नेपाळच्या सीमेकडील सिगात्से भागातील रस्ते, दळणवळण आणि वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले असून, दुय्यम आपत्ती रोखण्यासाठी देखरेख आणि पूर्वसूचना यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे.
