Nepal flash flood hydropower plant damage : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण पुराचा मोठा फटका देशातील जलविद्युत प्रकल्पांना बसला आहे. भारताला वीजपुरवठा करणारा १४ मेगावॅट क्षमतेचा देवीघाट जलविद्युत प्रकल्पही पुरामुळे प्रभावित झाला आहे. पुरामुळे नेपाळमधील अनेक वीज प्रकल्पांचे नुकसान झाल्याने देशाच्या वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.
भारताला ४०० मेगावॉट्स वीज पुरवठा
वरिष्ठ भारतीय सरकारी अधिकाऱ्याने द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, नेपाळने भारताला होणारा वीजपुरवठा सुमारे ८०० मेगावॅटवरून निम्म्यावर म्हणजे किमान ४०० मेगावॅटपर्यंत कमी केला आहे. भारताला वीज पुरवणारा १४ मेगावॅट क्षमतेचा देवीघाट जलविद्युत प्रकल्पही पुराचा फटका बसलेल्या प्रकल्पांपैकी एक होता. नेपाळमधील अनेक जलविद्युत प्रकल्पांकडून भारत वीज आयात करतो. ग्रिड इंडियाच्या आकडेवारीनुसार, २६ ऑगस्ट रोजी पुराच्या दिवशी भारताने नेपाळकडून कमाल ९६३.४ मेगावॅट वीज आयात केली होती.
बांगलादेशाला वीज देणारे प्रकल्पही प्रभावित
भारताला वीजपुरवठा करणाऱ्या देवीघाट प्रकल्पासह चिलिमे आणि त्रिशूली हे बांगलादेशाला वीजपुरवठा करणारे दोन जलविद्युत प्रकल्पही पुरामुळे प्रभावित झाले आहेत. नेपाळच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे देशातील सुमारे १३ जलविद्युत प्रकल्प आणि एका सौर प्रकल्पाचे नुकसान झाले आहे. या पुराचा फटका जवळपास ३५९ मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मिती प्रकल्पांना बसला असून, यातील बहुतांश प्रकल्प जलविद्युत आहेत.
रासुवा जिल्ह्यात मोठे नुकसान
नेपाळ सरकारच्या माहितीनुसार, रासुवा जिल्ह्यात एकूण २३६ मेगावॅट क्षमतेचे कार्यरत वीज प्रकल्प तसेच ३४२.४२ मेगावॅट क्षमतेचे तीन मोठे बांधकामाधीन जलविद्युत प्रकल्प पुरामुळे प्रभावित झाले आहेत. यामध्ये अप्पर त्रिशूली-१ (२१६ मेगावॅट), रसुवागढी (१११ मेगावॅट), रासुवा भोटेकोशी (१२० मेगावॅट), संजेन खोला (७८ मेगावॅट), अप्पर मेलुंग ए (६.४२ मेगावॅट), मेलुंग खोला (५ मेगावॅट), लैदांग खोला (२० मेगावॅट) आणि चिलिमे (२२ मेगावॅट) या प्रकल्पांचा समावेश आहे.
नुवाकोटमधील प्रकल्पांनाही फटका
नुवाकोट जिल्ह्यात १२३ मेगावॅट क्षमतेचे चार कार्यरत वीज प्रकल्प आणि ५२.६ मेगावॅट क्षमतेचे दोन बांधकामाधीन प्रकल्प पुरामुळे प्रभावित झाले आहेत. यामध्ये त्रिशूली जलविद्युत प्रकल्प (२४ मेगावॅट), देवीघाट जलविद्युत प्रकल्प (१४.१ मेगावॅट), अप्पर त्रिशूली – ३ए (६० मेगावॅट), अप्पर त्रिशूली – ३बी (३७ मेगावॅट), मिडल त्रिशूली गंगा (१५.६ मेगावॅट) आणि एक २५ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे.
नेपाळच्या वीज निर्मितीचा मोठा आधार जलविद्युत प्रकल्प
नेपाळची एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता सुमारे ४,३०० मेगावॉट असून, त्यातील बहुतांश वीज जलविद्युत प्रकल्पांमधून निर्माण होते. त्यामुळे या प्रकल्पांचे नुकसान झाल्याने देशाच्या वीज व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. नेपाळ आणि भारतातील वीज व्यापारही मोठ्या प्रमाणात हंगामी आहे. पावसाळ्यात जलविद्युत निर्मिती वाढल्यानंतर नेपाळ अतिरिक्त वीज भारताला विकतो, तर हिवाळ्यात पाण्याची उपलब्धता आणि जलविद्युत निर्मिती कमी असल्याने नेपाळ भारताकडून वीज आयात करतो.
