काठमांडू : हिमनदीचा काही भाग कोसळून आलेल्या महापुराने नेपाळमध्ये हाहाकार उडवला असून, या दुर्घटनेतील बळींची संख्या शनिवारी ६६९वर पोहोचली. या पुरामुळे अनेकांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे. येथे बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम आणि मदतकार्य सुरू असून, अद्याप  २,४२६ हून अधिक जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत ३,७०० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, भोटेकोशी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुन्हा पुराची लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

हिमनदी कोसळल्यानंतर बर्फ आणि दगडांचा मोठा लोट नदीच्या दिशेने आला. त्यानंतर पाणी, चिखल आणि दगडांचा प्रचंड प्रवाह शहरे आणि गावांमधून वाहत गेला. या प्रवाहात घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले, तर काही प्रकल्पांचेही नुकसान झाले.

१५  हजारांहून अधिक जवान तैनात

बचाव आणि शोधकार्यासाठी नेपाळ सरकारने १५  हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचार्‍यांना तैनात केले आहे. त्यात पाच हजारांहून अधिक नेपाळ लष्कराच्या जवानांचा समावेश आहे. भारतानेही मदतीचा हात पुढे केला असून, ११ सदस्यांचे पथक नेपाळमध्ये दाखल झाले. विविध जलविद्युत प्रकल्पांत अडकलेल्या १९१ कामगारांनाही बाहेर काढण्यात आले. यात दोन भारतीय कामगारांचाही समावेश आहे.

काठमांडू-मुगलिंग मार्ग सुरू

’काठमांडूला देशाच्या अन्य भागांशी जोडणारा महत्त्वाचा मुगलिंग-काठमांडू महामार्ग शनिवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पुर आणि दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे हा मार्ग बुधवारपासून बंद होता.

’मध्य नेपाळातील राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून पुराचा आणि दरडींचा धोका कायम असल्याने विस्कळित आहे.

१,७०६ जणांना वैद्यकीय मदत

धुंचे आणि त्रिशूली येथे उभारण्यात आलेल्या आपत्कालीन आरोग्य केंद्रांमध्ये पुरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आलेल्या १,७०६ जणांवर आतापर्यंत उपचार करण्यात आले आहेत. रुग्णालयांमध्ये पुरातील जखमी आणि बाधितांची गर्दी कायम असून, दुसरीकडे बेपत्ता नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांचीही मोठी गर्दी होत आहे.

पुन्हा पुराचा इशारा

एनडीआरआरएमएने शुक्रवारी आणखी एका पुराचा इशारा दिला होता. बुधवारी ज्या ठिकाणी महापूर आला, त्याच परिसरात पाण्याची पातळी वाढत असून, पाण्यासोबत चिखलाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या भागात पुन्हा मोठा पूर येण्याचा धोका असल्याचे प्राधिकरणाने सांगितले आहे. बचाव पथकांसमोर बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याबरोबरच संभाव्य दुसर्‍या पुराच्या संकटाला तोंड देण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

यात्रेकरूंची पर्यायी सीमा मार्गाने सुटका

* कैलास-मानसरोवर यात्रेतील भारतीयांसह शेकडो यात्रेकरूंनी शनिवारी पर्यायी झांगमू सीमा मार्गाने नेपाळमध्ये परतण्यास सुरुवात केली.

* भूकंप आणि भूस्खलनामुळे यापूर्वी बंद असलेला हा सीमा मार्ग यात्रेकरूंसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.

* ग्यिरोंग ही तिबेटमध्ये नेपाळमार्गे ये-जा करण्यासाठीची प्रमुख सीमा चौकी असून यात ही चौकी उद्ध्वस्त झाली.

* यात्रेसाठी तिबेटमध्ये गेलेले शेकडो परदेशी पर्यटक, त्यात मोठ्या संख्येने भारतीय यात्रेकरू, तेथे अडकले होते.

उरले-सुरले शोधण्याची धडपड

त्रिशूली गावातून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असतानाच काही ग्रामस्थ उद्ध्वस्त घरांकडे परतले. घरातून काय वाचवता येईल, याचा ते शोध घेत होते. शोभा श्रेष्ठा या महिलाही ‘स्वीटी’ या श्वानाचा शोध घेत परतल्या. तो सापडल्यानंतर त्यांनी त्याला जवळ घेत पाणी पाजले.

मुलाचा शोध घेताना अश्रू

मदतछावणीत बेपत्ता व्यक्तींची नावे भिंतीवर लावली आहेत. नातेवाइकांनी या याद्यांभोवती गर्दी केली आहे. काही जण याद्यांचे फोटो काढत होते, तर काही जण अश्रू पुसत नावे तपासत होते. राजेश कुमार राम आपल्या मुलाचे नाव शोधत होते. ‘कदाचित माझा मुलगा कुठेतरी असेल. कदाचित तो एखाद्या ठिकाणी अडकला असेल व सापडेल. त्या क्षणाचीच मी वाट पाहत आहे,’ असे ते अश्रू ढाळत म्हणाले.

२४ वर्षांच्या आठवणी दोन मिनिटांत उद्ध्वस्त

सगळे काही अवघ्या दोन मिनिटांत घडले, असे २५ वर्षीय सोनू अधिकारी सांगत होती. मध्य नेपाळमधील गाल्छी येथे महापुराचा इशारा मिळाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी घरातील महत्त्वाची कागदपत्रे घेतली आणि वाहनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ते घराबाहेर पडून अवघी दोन मिनिटे झाली असतील, तोच २४ वर्षांच्या आठवणी जपणारे त्यांचे संपूर्ण घर पुराच्या पाण्यात बुडाले. सोनू एकटीच नाही. शहरातील अनेक नागरिकांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत.

९७ वर्षीय वृद्धेची सुटका

चिखलाने माखलेल्या ९७ वर्षीय वृद्धेला जेसीबीच्या पुढच्या भागात बसवून सुरक्षित ठिकाणी नेले जात असल्याचे दृश्य महापुरातून बचावलेल्या नागरिकांच्या संघर्षाचे प्रतीक ठरले आहे. गुणा माया बोहरा या वृद्धेला चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांच्या निवासस्थानी कोसळलेल्या ढिगार्‍यातून जिवंत बाहेर काढण्यात आले. त्यांचा नातलग दीपक याने, ‘लढाई जिंकून परतलेल्या योद्ध्यासारख्या त्या दिसत होत्या,’ असे सांगितले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दातृत्वाचा ओघ

काठमांडू : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण महापुराने मोठी जीवित आणि वित्तहानी केली असतानाच, आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान आपत्तीनिवारण निधीत अवघ्या तीन दिवसांत २.२९५ अब्ज नेपाळी रुपयांची मदत जमा झाली आहे. बुधवारी दुपारपासून शुक्रवारीपर्यंत विविध संस्था आणि व्यक्तींनी या निधीत योगदान दिले. त्यामुळे निधीतील एकूण शिल्लक २.१७ अब्ज रुपयांवरून ४.०९ अब्ज रुपये झाली आहे.

हिमनदी का कोसळली?

भूकंपामुळे हा प्रकार घडला की वाढत्या तापमानामुळे हिमनदी वितळली, याचा तपास सुरू आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, जागतिक तापमानवाढीचाही यात काही वाटा असू शकतो. रॉयटर्सने पडताळलेल्या चित्रफितींमध्ये लांगटांग लिरुंग पर्वतशिखराजवळील हिमनदीचा खालचा भाग तुटून दरीत कोसळताना दिसतो. त्यानंतर बर्फ आणि दगडांचा प्रचंड लोट आणि भूस्खलन झाले. या घटनेची कारणमीमांसा करण्यासाठी पुरेसा वैज्ञानिक डेटा उपलब्ध नाही.

मृतांच्या छायाचित्रांद्वारे आप्तांचा शोध

* भिंतींवर लावलेल्या मृतांच्या छायाचित्रांत आप्तांचा शोध घेणारे कुटुंबीय, चिखल आणि ढिगार्‍यात आपल्या वस्तू शोधणारे नागरिक, उद्ध्वस्त इमारतींच्या बाजूने मुलाला घेऊन जाणारी महिला आणि मृत कुत्रा…

* नेपाळमधील भीषण महापुरानंतरची ही विदारक दृश्ये आपत्तीची तीव्रता सांगत आहेत. दिवस जसजसा पुढे जात आहे, तसतशी बेपत्ता नातेवाइकांच्या कुटुंबीयांची आशा मावळत चालली आहे.

* बचाव पथके प्रतिकूल परिस्थितीतही जीव वाचलेल्यांचा आणि बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. रुग्णालयांबाहेर जखमींची यादी तपासण्यासाठी कुटुंबीयांच्या रांगा लागल्या आहेत.