Nepal water levels rising; flood risk : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण पुरानंतर तयार झालेल्या जलाशयाचा बांध फुटल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ-चीन सीमेवरील रासुवा जिल्ह्यातील या जलाशयाचा बांध तुटला असून पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. या जलाशयाची निर्मिती बुधवारी झालेल्या सुरुवातीच्या भूस्खलनानंतर झाली होती. जलाशयाचा बांध फुटल्यास नेपाळमध्ये आणखी मोठा पूर येऊ शकतो, असा इशारा चीनने यापूर्वीच दिला होता. याबाबत सविस्तर वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

हिमनदी कोसळल्याने प्रचंड पूर

नेपाळ आणि चीनच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हिमालयीन भागात हिमनदीचा मोठा भाग कोसळला. त्यानंतर दगड, बर्फ, चिखल आणि मलब्याचा प्रचंड लोंढा नदीच्या प्रवाहातून खाली आला. या पुराच्या तडाख्यात नदीकाठची गावे, रस्ते आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा वाहून गेल्या. काठमांडूला तिबेटमधील ल्हासाशी जोडणाऱ्या मार्गालाही याचा मोठा फटका बसला आहे. या मार्गावर मोठ्या संख्येने ट्रेकर्स आणि यात्रेकरू ये-जा करत असतात. या मृतांची निश्चित संख्या ४६९ वर पोहोचली असून, जवळपास १,००० लोक अजूनही बेपत्ता आहेत. तर बेपत्ता असलेल्या लोकांमध्ये किमान ५४० परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

बचावकार्य थांबवले

जलाशयाचा बांध फुटण्याचा धोका निर्माण झाल्यानंतर चीनने आपल्या बाजूचे बचावकार्य तात्पुरते थांबवले. सुरक्षिततेच्या कारणास्तव चीनमधील बचाव पथके आणि वाहने सुरक्षित ठिकाणी माघारी घेण्यात आली, अशी माहिती चिनी सरकारी प्रसारमाध्यमांनी दिली. नेपाळमध्येही जलाशय ओसंडून वाहू लागल्यानंतर सुमारे ९० मिनिटांसाठी बचावकार्य थांबवण्यात आले, अशी माहिती एका लष्करी अधिकाऱ्याने रॉयटर्सला दिली.

हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्यालाही स्थगिती

यापूर्वी, नेपाळी बचाव पथकांनी वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी आणि शहरे व खोऱ्यांमध्ये अडकलेल्या हजारो लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला. त्याच वेळी, काही ठिकाणी श्वानपथकांचा वापर करून, मैदानी भागात प्रवाहाबरोबर वाहून आलेले मृतदेह बाहेर काढले. यानंतर रासुवा जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरू असलेले बचावकार्यही तात्पुरते थांबवण्यात आले. पुराचा धोका वाढल्याने स्थानिक नागरिकांनी सुरक्षिततेसाठी उंच भागांकडे धाव घेतली.

जलाशयातील पाण्याचा प्रवाह आणि पाणीपातळीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात असून, परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन बचाव यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.