Shashi Tharoor PM Modi Nepal Flood rescue praise: काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. यापूर्वीही त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करत काँग्रेसला तोंडघशी पाडले होते. यावेळी त्यांनी नेपाळमधील भीषण पूरपरिस्थितीनंतर भारताने ज्याप्रकारे तात्काळ हस्तक्षेप केला आणि या संकट निवारणासाठी जी भूमिका घेतली त्याबद्दल सरकारचे कौतुक केले.

एका बाजूला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून नेपाळला मानवतावादी मदत करण्याबाबत सुचवले होते. तिथे अडकलेल्या भारतीयांना तात्काळ सुरक्षितरित्या परत आणण्यासंदर्भात बचाव कार्याला वेग देण्याची मागणी त्यांनी केली होती. तर शशी थरूर यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री शशी थरूर यांना पत्र लिहून भारताने केलेल्या बचाव कार्याचे कौतुक केले आहे.

शशी थरूर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, नेपाळमधील भीषण पुरानंतर भारताचा प्रतिसाद जलद आणि भरीव होता. पंतप्रधान मोदींनी नेपाळशी लवकर संपर्क साधत मदतीचा हात पुढे केला. मदत साहित्याच्या चार खेपा, डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि टनेल रेस्क्यू तज्ज्ञांचे अकरा सदस्यी पथक, तसेच नियंत्रण कक्ष आणि दूतावासाच्या हेल्पलाईनमुळे मोठी मदत झाली.

तसेच बचावकार्यात मदत करणारे भारतीय राजदूत श्रीवास्तव आणि त्यांच्या टीमचीही त्यांनी प्रशंसा केली.

शशी थरूर पुढे म्हणाले, नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्यांचे कुटुंबीय त्यांना बुधवारपासून संपर्क साधत आहेत. यापैकी कुणीही सरकारच्या प्रतिसादाबद्दल तक्रार केलेली नाही. याउलट आपल्या बेपत्ता नातेवाईकांबद्दल बोलण्यापूर्वी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच तिबेटमधून भारतीय नागरिकांना यशस्वीरित्या परत आणणे आणि त्रिशुली-१ जलविद्युत प्रकल्पातून भारतीय कामगारांची सुटका, याबाबत बोलताना शशी थरूर यांनी हा खरा विजय असल्याचे म्हटले.

लष्कर, एनडीआरएफचे पथक तैनात करण्याची मागणी

एस. जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात शशी थरूर पुढे म्हणाले, नेपाळमध्ये अद्यापही बेपत्ता असलेल्या ३२० भारतीय नागरिकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची तुकडी, लष्करी अभियंते, भारतीय हवाई दलाची अवजड मालवाहू हेलिकॉप्टर्स आणि विशेष शोध उपकरणे तात्काळ तैनात करण्यात यावीत. ढिगाऱ्याखाली अजूनही काही जिवंत लोक असू शकतात. त्यांना जिवंत बाहेर काढता येण्याची शक्यता तासागणिक कमी होत चालली आहे, असेही शशी थरूर म्हणाले.

मृतांची संख्या ६६९ पेक्षा जास्त, २४०० अद्याप बेपत्ता

पूरामुळे मृतांची संख्या ६६९ वर पोहोचला आहे. पूराच्या तडाख्यात आलेल्या आठ जिल्ह्यांमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी शनिवारी दिली. २,४०० हून अधिक लोक अद्यापही बेपत्ता आहेत, तर १६३ विदेशी नगारिकांसह सुमारे २,५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली.

बचाव कार्यासाठी नेपाळ लष्करातील ५,००० हून अधिक जवान तैनात असून ११,००० हून अधिक सुरक्षा कर्मचारीही त्यांच्या दिमतीला आहेत, अशी माहिती पीटीआयने दिली.