वृत्तसंस्था, काठमांडू
तिबेटमधून अचानक आलेल्या पुरामुळे बुधवारी मध्य नेपाळमध्ये हाहाकार उडाला. यात जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला असून ७५०पेक्षा अधिक लोक बेपत्ता झाले. त्यामध्ये १३३ भारतीय आणि ३७ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. बेपत्ता पर्यटकांपैकी ३७ जण तमिळनाडूच्या तंजावर येथील होते. तर, बेपत्ता भारतीयांपैकी किमान ५० जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. ‘इशा फाउंडेशन’ने सांगितले की, त्यांचे इमिग्रेशन केंद्रावर असलेले ७७ सदस्य बेपत्ता आहेत. नेपाळच्या सीमेवर असलेल्या बिहार आणि उत्तर प्रदेशलाही पुराचा इशारा देण्यात आला आहे.
नेपाळ सरकारने दिलेल्या माहितीनुसार ९५ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजूनही जवळपास ५००जण बेपत्ता आहेत. तर, चीनमधील सरकारी ‘सीजीटीएन’ या सरकारी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, तिबेटमध्ये तीन मृतदेह सापडले असून २६५ लोक बेपत्ता आहेत. दुसरीकडे, निरनिराळ्या ठिकाणी पुरात अडकलेल्या सुमारे १०० लोकांची सुटका करण्यात आली, असे अधिकार्यांनी सांगितले. त्यापैकी ३० जणांवर काठमांडूच्या त्रिभुवन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या जलप्रपातामध्ये अनेक गावे आणि खेडी अक्षरश: उद्ध्वस्त झाली, अनेक पूल वाहून गेले तसेच अनेक जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या ध्वनिचित्रफितींमध्ये वेगाने वाहत येणार्या चिखलयुक्त पाण्याची धडकी भरवणारी दृश्ये दिसत आहेत.
एका चित्रफितीमध्ये एक चार मजली इमारत अक्षरश: वाहून गेली, अन्य एका दृश्यात एक रसुवा येथे पुराच्या पाण्यात कार वाहत गेली. तर केवळ पाण्याच्या बलाने एका पुलाचे दोन तुकडे झाले. अन्य काही चित्रफितींमध्ये पूल कोसळले आणि पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे दिसले. तसेच आठ जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले. त्यांची एकूण क्षमता ३५४ मेगावॅट इतकी होती.
या भीषण पुरामुळे झालेले नुकसान पाहता, जागतिक बँकेने २५ अब्ज नेपाळी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
सातार्याचे पर्यटक अडकल्याची भीती
सातारा : नेपाळमध्ये काही सातार्याचे पर्यटक अडकले आहेत. जिल्ह्यतील जे नागरिक किंवा पर्यटक पूरस्थितीमुळे अडकले आहेत अथवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकत नाही, त्यांनी तातडीने जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाने केले आहे. अडकलेल्या पर्यटकांची अचूक माहिती संकलित करून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक तो समन्वय प्रशासनाकडून साधला जात आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील पुरात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. या संकटकाळी भारतीय नेपाळबरोबर असल्याचे राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे. काँग्रेसनेही नेपाळमधील संकटाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना शक्य त्या सर्व मानवतावादी मदतीचे आश्वासन दिले. शहा यांनी भारताच्या मदतीबद्दल आभार मानले आहेत. काठमांडूमधील भारतीय दूतावासाने भारतीयांसाठी ९७७९८५१३१६८०७ अथवा ९७७९७०९१०७५०० हे आपत्कालीन फोन क्रमांक जारी केले आहेत.
‘एनडीआरएफ’ला सज्जतेची सूचना
नवी दिल्ली : नेपाळमधील पुरामुळे बिहारमधील गंदक नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये सीमाभागात पाणी साचले आहे. या परिस्थितीमुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. ‘एनडीआरएफ’ परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असून पूरस्थितीत बचावासाठी २० पथके तैनात करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
योगी आदित्यनाथ यांच्याकडून चिंता
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेपाळमधील पूरस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असून, नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या महाराजगंज आणि कुशीनगरच्या जिल्हा प्रशासनाला संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
परिस्थितीवर लक्ष
नवी दिल्ली : नेपाळमधील पूरस्थितीवर केंद्र सरकारचे बारकाईने लक्ष असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याशी चर्चा केली. त्रिशुली नदीच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे केंद्रीय जल आयोगाने सावधगिरीचा इशारा दिला आहे.
पूर कसा आला?
काठमांडू : सीमाभागात भूकंप येऊन हिमस्खलन झाले, बर्फाचे मोठे खडक नेपाळच्या लेंडे खोला नदीत आदळून पूर आला, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. लेंडे खोला नदी नेपाळ आणि तिबेट या दोन्ही देशांमधून वाहते. लेंडे खोला ही भोटे कोशी नदीची उपनदी आहे. उपग्रहाद्वारे प्राप्त छायाचित्रांचे विश्लेषण करून हाती आलेल्या प्राथमिक अभ्यास अहवालांनुसार, नेपाळ-तिबेट सीमेजवळ ईशान्य दिशेला २० किमी अंतरावर अस्थिर पर्वतीय खडकांमधील एक खडक घसरल्याचे सांगण्यात आले. तिबेटच्या सीमेवर असलेल्या रसुवाला सर्वात आधी पुराने गाठले. त्यानंतर नुवाकोट, चितवन, गोरखा, तनाहू आणि नावलपारसी पूर्व या जिल्ह्यंमध्येही पुराचे पाणी, चिखल आणि गाळ पसरला. त्यामध्ये अनेक घरे अंशत: किंवा पूर्ण बुडाली.
नेपाळच्या ‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ने माहितीनुसार, लेंडे खोला नदीला पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याचा प्रवाह भोटे कोशी नदीतून त्रिशुली नदीमध्ये शिरला. बेपत्ता लोकांमध्ये नेपाळ लष्कराच्या ४४ जवानांसह ८० सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे, अशी माहिती नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी नेपाळच्या संसदेला दिली. स्थानिक वेळेनुसार तिबेटमध्ये सकाळी ८.३७ वाजता भूकंप आला आणि त्यानंतर तीन मिनिटांनी पूर आला. त्यावरून भूकंपामुळेच हिमनदीला अचानक पूर आला असावा, असा अंदाज खनाल यांनी व्यक्त केला.
