नेपाळ आणि तिबेटच्या सीमाभागात आलेल्या विनाशकारी महापुराने हाहाकार माजवला आहे. शेकडो लोकांचा जीव गेला असून हजारो नागरिक बेपत्ता आहेत. आत्तापर्यंत या पुरात ३९० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी नेपाळ सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या विनाशकारी पुरामुळे २८८ भारतीय बेपत्ता असून २०० जण तिबेटमध्ये अडकल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली.
मात्र, या भीषण संकटाच्या काळात माणुसकीला काळीमा फासणारा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका मृत महिलेच्या डोक्याचे केस पकडून तिला किनाऱ्यावर खेचण्यात आले आणि तिच्या कानातील सोन्याचे दागिने चोरण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेपाळ पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
केसांना धरून मृतदेह ओढला, अन्….
प्रचंड व्हायरल झालेल्या ४१ सेकंदांच्या एका व्हिडिओमध्ये ही चीड आणणारी घटना स्पष्ट दिसत आहे. नारायणी नदीच्या महापुरात एका महिलेचा मृतदेह वाहून आला होता. तिथे जमलेल्या दोन पुरुषांनी लाकडी पाट्या आणि महिलेच्या डोक्याच्या केसांचा वापर करून मृतदेह पाण्याच्या बाहेर खेचला. त्यानंतर तात्काळ तिच्या दोन्ही कानातील सोन्याचे दागिने काढून शेजारी ठेवले. विशेष म्हणजे, हा सगळा प्रकार घडत असताना आजूबाजूला उभे असलेले अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करत होते, पण कोणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेपाळ पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. व्हिडिओच्या आधारे तपास करत चितवन पोलिसांनी दोन संशयितांची ओळख पटवली. मदन गुरुंग (वय २५) आणि उमेश चौधरी (वय ३८) अशी या आरोपींची नावे आहेत. भरतपूर महानगरपालिकेच्या पोखरा बस पार्क भागातून पोलिसांनी गुरुवारी या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
नेपाळ पोलिसांनी या कारवाईचा व्हिडिओ आणि माहिती शेअर करत स्पष्ट केले की, अशा आपत्तीच्या काळात किंवा कठीण प्रसंगात पीडितांची लूट करणे अथवा अमानवी वर्तन करणे खपवून घेतले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार; ३९० हून अधिक जणांचा मृत्यू
नेपाळमध्ये गेल्या काही वर्षांतील हा सर्वात भयानक पूर मानला जात आहे. नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात मुसळधार पावसामुळे आलेला फ्लॅश फ्लड (अचानक आलेला महापूर) आणि भूस्खलनामुळे संपूर्ण गावेच्या गावे वाहून गेली आहेत.
- मृत्यूचा आकडा: पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत किमान ३९२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
- बेपत्ता नागरिक: सुमारे १,४०० हून अधिक नागरिक अजूनही बेपत्ता असून बचाव पथके चिखलातून वाट काढत त्यांचा शोध घेत आहेत.
- तिबेटमधील परिस्थिती: तिबेटमधील केरुंग पोर्ट भागातील एका बहुमजली इमारतीला आणि बस पार्किंगला महापुराचा मोठा फटका बसला आहे. या भागात तब्बल ५ फूट खोल चिखलाचा थर साचल्याची माहिती आहे.
सीमाभागातील रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून सातत्याने होणाऱ्या पावसामुळे पुन्हा भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
