Nepal flood missing Indians and the ongoing emergency: नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुरामुळे आलेल्या महाप्रलयानं मानवी प्रयत्नांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. हिमस्खलनामुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. मात्र, या पुरामुळे काही क्षणांत मोठ्या वेगानं आणि मोठ्या प्रमाणावर आलेल्या पाण्यामुळे गावंच्या गावं वाहून नेल्याची भयानक दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागली आहेत. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या दृश्यांमध्ये निसर्गाचा कोप आणि जगण्यासाठीची माणसाची धडपड अशा दोन्ही बाबी प्रकर्षानं जाणवत असल्याचं दिसून येत आहे. नेपाळमधील या पूरस्थितीत जवळपास ३०० भारतीय बेपत्ता असून त्यात ईशा फाऊंडेशनचे ७७ पर्यटक व ३ स्वयंसेवक अशा एकूण ८० जणांचा समावेश आहे. आत्तापर्यंत या पुरात २७७ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
बुधवारी सकाळच्या सुमारास नेपाळच्या रसुवा जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला. तिबेटच्या सीमेला लागूनच नेपाळमधील हा भाग असून तिबेटमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे ही भीषण पूरस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे भोते कोशी आणि त्रिशुली नद्यांना मोठा पूर आला आहे. या पूरस्थितीमुळे नेपाळमध्ये आत्तापर्यंत जवळपास १५०० नागरीक बेपत्ता झाल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
लेंडे खोला, भोते कोशी नद्यांना मोठा पूर!
“प्रत्यक्ष घटनास्थळांचं व्हिडीओ फूटेज आणि प्रभावित क्षेत्रातून आलेल्या माहितीवरून असं दिसून येतंय की मोठ्या प्रमाणावर बर्फ आणि दगडांचा राडारोडा लेंडे खोला नदीमध्ये दाखल झाला. हीच नदी पुढे भोते कोशी नदीला जाऊन मिळते. संशोधकांच्या मते अचानक झालेल्या या घडामोडींमुळे नद्यांना पूर आला असावा”, अशी माहिती ICIMOD कडून बुधवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
ईशा फाऊंडेशनचे पर्यटकही बेपत्ता!
दरम्यान, ईशा फाऊंडेशनतर्फे नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले जवळपास ७७ जण पुरात बेपत्ता झाल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. याशिवाय, तमिळनाडूतून नेपाळला गेलेले ३७ पर्यटकदेखील बेपत्ता झाले आहेत. मानसरोवर यात्रेसाठी भारतातून गेलेल्या पर्यटकांचादेखील नेपाळच्या पुरात बेपत्ता झालेल्या ३०० भारतीयांमध्ये समावेश आहे. याशिवाय, अनेक भारतीय पर्यटक पुरामुळे नेपाळमध्येच ठिकाठिकाणी अडकून पडले आहेत. नेपाळच्या मध्यवर्ती भागातील अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे असंख्य पर्यटकांना नियोजित स्थळी पोहोचता येत नसल्याचं चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे.
नेपाळ पुराच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना निर्देश
नेपाळमधील पूरस्थितीमध्ये जवळपास ३०० हून अधिक भारतीय बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती नेपाळमधील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनेदेखील पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सर्वा राज्य सरकारांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. आपापल्या राज्यांमधील किती आणि कोणते पर्यटक नेपाळमधील पुरामध्ये बेपत्ता झाले आहेत, याची माहिती गोळा करून ती केंद्र सरकारला पाठवण्याचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. या माहितीमध्ये संबंधित व्यक्तीचं नाव, संपर्क क्रमांक आणि इतर आवश्यक माहितीचा समावेश आहे.
नेपाळमध्ये आणखी एक पूर येऊ शकतो!
दरम्यान, तज्ज्ञांनी नेपाळमध्ये आणखी एक पूर येऊ शकतो अशी धक्कादायक शक्यता वर्तवली आहे. “लेंडे खोला नदीत झालेल्या हिमस्खलनामुळेच हा महापूर आल्याचा प्राथमिक अंदाज असला,अद्याप पुराचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. नेपाळ-चीन सीमेवर अजूनही एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहून आलेला बर्फ अडकलेला असून तो बर्फ तिथून मोकळा झाल्यास आणखी एका पुराचा सामना नेपाळला करावा लागू शकतो असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळेच नेपाळच्या जिलाँग बंदर व आसपासच्या परिसरातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत”, अशी माहिती ICIMOD पर्यावरणीय धोका व वातावरणातील बदल विभागाचे प्रमुख क्वांगाँग झँग यांनी निवेदनामध्ये दिली आहे.
