पीटीआय, काठमांडू : भीषण पुराच्या तडाख्यातून सावरणार्या नेपाळमध्ये पुन्हा पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. भोटेकोशी नदीची पातळी वाढल्याने पूरग्रस्त जिल्ह्यांतील नागरिकांना रविवारी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. नागरिकांच्या मोबाइलवर पूराच्या धोक्याचे संदेश पाठवण्यात आले. दरम्यान, बुधवारच्या महापुरातील मृतांचा आकडा नेपाळमध्ये ७८८वर पोहोचला असून, २,५०२ जण अद्याप बेपत्ता आहेत. काठमांडूला सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांपैकी एका भागाशी जोडणार्या प्रमुख महामार्गावरील मलबा हटविण्याचे काम बचाव पथकांनी सुरू केले आहे. मात्र, नव्या पुराच्या इशार्यामुळे बचाव आणि मदतकार्यापुढील आव्हान वाढले आहे.
वारंवारच्या इशार्यांमुळे नागरिक त्रस्त
पूर येण्याची सूचना मिळाल्यानंतर रात्रीच्या वेळीही नागरिकांना उंच ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. ‘कधी पूर येणार असल्याचे सांगतात आणि पुन्हा उंच ठिकाणी जावे लागते. माझे वडील ७२ आणि आई ७० वर्षांची आहे. त्यांना उचलून घेऊन जावे लागते. मी थकलो आहे,’ अशी व्यथा गोविंद श्रेष्ठ यांनी व्यक्त केली.
महापूर का आला?
हिमनदीचा काही भाग कोसळल्यानंतर महापूर आला. हिमनदीखालील खडकांचा मोठा भाग कोसळत हिमनदीचा काही भागही खाली आला. या भूस्खलनाची तीव्रता इतकी होती की त्याची नोंद ५.२ तीव्रतेच्या भूकंपासारखी झाली.
चीनकडूनही धोक्याचा इशारा
पुरानंतर पर्वतीय भागात तयार झालेले एक नवीन सरोवर बहुतांश रिकामे झाले आहे. मात्र, त्यापासून सुमारे ५.६ किलोमीटर अंतरावर वरच्या बाजूस असलेल्या एका विवरात अंदाजे १४ लाख घनमीटर पाणी साचले असून, त्यापासून अद्याप धोका संभवतो. त्यामुळे या भागावर बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचना चीनच्या जलसंपदा मंत्रालयाने केली आहे.
तिबेटमध्येच २६१ परदेशी नागरिक बेपत्ता
चीनच्या हद्दीतही या आपत्तीत १६ जणांचा मृत्यू आणि ५४६ जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये डझनहून अधिक देशांतील नागरिकांचा समावेश आहे. पर्वतारोहण, पर्यटन, काम किंवा धार्मिक यात्रेसाठी या भागात गेलेले अनेक जण अद्याप संपर्कात आलेले नाहीत. तिबेटमध्येच २६१ परदेशी नागरिक बेपत्ता आहेत.
हवामान बदलाचा फटका?: नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खानाल यांनी उत्सर्जनात नेपाळचा वाटा केवळ ०.१ टक्के असतानाही हवामान बदलाचा फटका बसत असल्याचे म्हटले. मात्र, आपत्तीचा संबंध तापमानवाढीशी जोडणे घाईचे ठरेल, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती
आपत्तीला पाच दिवस उलटूनही अनेक नागरिक बेपत्ता आहेत. त्यामुळे बचाव पथकांसमोर ढिगार्याखाली किंवा पुराच्या प्रवाहात अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे. मृतदेह सापडण्याचे प्रमाण वाढत असल्याने मृतांचा आकडाही आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
‘सगळे गेले; पण घर पुन्हा उभे करू’
‘सगळे काही इथेच होते; आता मात्र काहीच उरलेले नाही,’ अशी व्यथा नेपाळमधील गाल्छी येथील नयन तिवारी याने व्यक्त केली. २६ ऑगस्टला आलेल्या महापुराने घर उद्ध्वस्त झाले, संसार वाहून गेला; मात्र त्यानंतरही तिवारी कुटुंबाने आशा सोडलेली नाही. चिखल आणि मलब्यातून उरलेल्या वस्तू शोधत हे कुटुंब पुन्हा घर उभे करण्याच्या प्रयत्नात आहे.
हजारो जण तात्पुरत्या निवार्यांत
भीषण पुरातून बचावलेल्या हजारो नागरिकांसमोरील संकट अद्याप संपलेले नाही. पूरग्रस्त भागांतील घरे, रस्ते आणि पाणीपुरवठा यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याने अनेक कुटुंबांना तात्पुरत्या निवार्यांमध्ये आसरा घ्यावा लागला आहे. या निवार्यांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असून, गर्दीमुळे आजार पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे. त्याचवेळी बेपत्ता नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय रुग्णालये आणि मदतछावण्यांमध्ये भटकत आहेत.
घराच्या अवशेषांत संसाराचा शोध
सर्वाधिक बाधित भागांपैकी धादिंगमध्ये काही नागरिक उद्ध्वस्त झालेल्या घरांकडे परतले आहेत. घरांच्या भिंती वाहून गेल्या असून, चिखल आणि मलब्याखाली गाडलेल्या वस्तू शोधण्याचे काम ते करीत आहेत. चिखल हटवून उपयोगी वस्तू वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका नागरिकाला त्याची कोंबडी जिवंत सापडली. ‘सगळे संपले आहे. आमचे घरही उरलेले नाही,’ अशी व्यथा धादिंगमधील शर्मिला तामांग यांनी व्यक्त केली.
वीज, पूल आणि रस्ते उद्ध्वस्त
वीज प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित आहे. वीजेचे खांब, तारा चिखलात अडकलेल्या आहेत. मोठे पूल आणि लहान झुलते पूल वाहून गेल्याने नदीच्या पलीकडील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ‘जे तिकडे आहेत ते तिकडेच अडकले आणि जे इकडे आहेत ते इकडेच अडकले आहेत. परिस्थिती अत्यंत कठीण होणार आहे,’ असे स्थानिक नागरिक सत्तनसिंह तामांग यांनी सांगितले.
चिखलात रुतलेली मुलांची स्वप्ने…
नेपाळमध्ये पुरामुळे अनेक शाळांचे नुकसान झाले, अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पूर आला त्यावेळी काही शाळांच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविले. जीव वाचवण्याच्या गडबडीत विद्यार्थ्यांना त्यांची दप्तरे, पुस्तके, डबे शाळेतच सोडून द्यावी लागली. पूर ओसरल्यानंतर पालक आणि मुले आपल्या उद्ध्वस्त झालेल्या शाळांमध्ये पुस्तके व दप्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबईतील नातेवाईकांच्या चिंतेत भर
नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे मुंबई आणि परिसरात राहणार्या नेपाळी नागरिकांना नेपाळमधील आपल्या नातेवाईक, कुटुंबाची काळजी लागली आहे. काळजीपोटी फोनाफोनी सुरू असली तरी अनेकांचे संपर्क होत नसल्याने चिंता वाढली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात सुमारे दोन ते अडीच लाख नेपाळी नागरिक वास्तव्यास असल्याचा अंदाज आहे. सुरक्षा रक्षक, हॉटेल-रेस्टॉरंटमधील कर्मचारी, घरगुती मदतनीस, स्वयंपाकी आणि केअरटेकर म्हणून ते मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. पूरग्रस्त भागात मोबाइल टॉवर उद्ध्वस्त झाल्याने संपर्क यंत्रणा ठप्प झाली आहे. नातेवाईकांची माहिती घेण्यासाठी मुंबईतून अनेक फोन येत आहेत,’’ असे संयुक्त नेपाळ महासंघ, मुंबईचे अध्यक्ष भरत रावल यांनी सांगितले. नागरिकांच्या नातेवाईकांची घरे पुरात वाहून गेल्याचे समोर आले असून, संपर्क न झाल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
कुठे किती मृतदेह?
चितवन : २७२
नवलपरासी पूर्व : १९९
नवलपरासी पश्चिम : १००
गोरखा : ५८
धादिंग : ५२
तनाहू : ३७
