नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराच्या विध्वंसातून एक दिलासा देणारी घटना समोर आली. ९७ वर्षांच्या गुना माया बोहरा यांना ढिगाऱ्याखालून चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
गुना माया यांच्या बचावाची कहाणी त्यांच्या कुटुंबीयांसाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. त्यांचे पणतू दीपक बोहरा यांनी काठमांडूहून घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी बीबीसी नेपाळला सांगितले की, ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर गुना माया यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून त्या “युद्ध जिंकून परतलेल्या योद्ध्यासारख्या” दिसत होत्या. महापुराचे पाणी आणि ढिगाऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता. सर्वत्र पाणी आणि ढिगारा पसरला होता. रस्ते आणि पूल वाहून गेल्याने बचावकार्यही अत्यंत कठीण झाले होते.
दीपक यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबातील काही जण झाडांना दोर बांधून पुढे गेले. तेथे त्यांना गुना माया जिवंत असल्याचे समजले. काही वेळाने ढिगाऱ्यातून त्यांच्या शरीराचा वरचा भाग दिसू लागला. यानंतर कुटुंबीय, स्थानिक नागरिक, पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी त्यांच्या बचावावर लक्ष केंद्रित केले. सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले. त्यांना उत्खनन यंत्राच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आणि पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महापुराने नेपाळ-तिबेट मार्ग उद्ध्वस्त
बुधवारपासून नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला आहे. हिमालयातील सीमावर्ती भागात हिमस्खलन झाल्याने अचानक पूर आला. पुराच्या पाण्याने रस्ते, पूल आणि वीजवाहिन्या उद्ध्वस्त केल्या आहेत. काठमांडूला तिबेटमधील ल्हासाशी जोडणारा महत्त्वाचा मार्गही बाधित झाला आहे. याच मार्गाचा वापर कैलास-मानसरोवर यात्रेला जाणारे भाविक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणावर करतात.
असोशिएट प्रेसच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये आतापर्यंत ३,७०० हून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे. हजारो सुरक्षा कर्मचारी बचाव आणि शोध मोहिमेत सहभागी आहेत. मात्र, ढिगारा आणि पुरामुळे नदीचा प्रवाह अडल्याने आणखी एक धोका निर्माण झाला. त्यातून तयार झालेल्या जलाशयात लाखो घनमीटर पाणी साचले. रायटर्सच्या वृत्तानुसार, या पाण्याचे प्रमाण २५ लाख घनमीटरपेक्षा अधिक झाले होते. जलाशय ओव्हरफ्लो होऊन भोटेकोशी नदीत पाणी गेल्यानंतर नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यात आले.
भारतीय नागरिकांचाही शोध सुरू
या आपत्तीचा परिणाम भारतातील यात्रेकरूंवरही झाला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, सुमारे ३२० भारतीय नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. चिनी बाजूला अडकलेल्या ९६ भारतीयांना मात्र जमिनीमार्गे नेपाळमध्ये आणण्यात आले आहे. या भीषण आपत्तीत शेकडो जणांचा मृत्यू झाला असताना, ९७ वर्षीय गुना माया बोहरा यांचा ढिगाऱ्यातून जिवंत बचाव आशेचा दुर्मीळ क्षण ठरला आहे.
