नेपाळमध्ये २६ ऑगस्टला आलेल्या भीषण पुराच्या वेळी प्रसंगावधान राखून तब्बल १,६०० विद्यार्थ्यांचा जीव वाचवणाऱ्या मुख्याध्यापकांच्या शाळेच्या पुनर्बांधणीसाठी भारत मदत करणार आहे. नेपाळच्या नुवाकोट जिल्ह्यातील बिदूर येथील त्रिभुवन त्रिशूली माध्यमिक शाळेची संपूर्ण पुनर्बांधणी भारताच्या मदतीने केली जाणार आहे. पुराच्या तडाख्यात ही संपूर्ण शाळा वाहून गेली होती. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
पुराचा इशारा मिळताच शाळा रिकामी केली
शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांना परिसरातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याच्या सूचना मिळत होत्या. पुराचे पाणी वरच्या बाजूला असलेल्या बेत्रावती वस्तीत पोहोचल्याची माहितीही त्यांना मिळाली होती. काही मिनिटांच्या अंतरात त्यांना पुराबाबत चार इशारे मिळाले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच दवाडी यांनी शाळेची घंटा वाजवून विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला. नदीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या वसतिगृहाभोवती पुराचे पाणी वेगाने पसरताना दिसल्यानंतर त्यांनी आणखी विलंब न करण्याचा निर्णय घेतला.
‘१० मिनिटे उशीर झाला असता तर…’
त्रिशूली खोऱ्यातून आलेल्या प्रचंड वेगाच्या पुराच्या पाण्याने शाळेसह परिसरातील अनेक भाग उद्ध्वस्त केले. मुख्याध्यापक दवाडी यांनी यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की शाळा रिकामी करण्याचा निर्णय आणखी १० मिनिटांनी घेतला असता तर विद्यार्थ्यांसह त्यांचाही जीव धोक्यात आला असता. शाळेतील १६ वर्षीय विद्यार्थिनी युनिशानेही या प्रसंगाबाबत सांगताना मी आणि माझे मित्रमैत्रिणी केवळ काही सेकंदांच्या फरकाने बचावलो, असे म्हटले. तिच्या डोळ्यांसमोर काही क्षणांतच बाजारपेठेचा परिसर पुराच्या पाण्यात वाहून गेला.
भारताच्या राजदूतांनी घेतली मुख्याध्यापकांची भेट
नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी मंगळवारी मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना वेळेत सुरक्षित स्थळी हलवण्याच्या त्यांच्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. श्रीवास्तव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत माहिती देताना सांगितले की, दवाडी यांनी वेळीच शाळेची घंटा वाजवून परिसर रिकामा केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
भारत-नेपाळ सहकार्याची जुनी परंपरा
त्रिभुवन त्रिशूली माध्यमिक शाळेचा भारत-नेपाळ सहकार्याशी जुना संबंध आहे. १९५०च्या दशकात भारतीय मदतीने या शाळेची स्थापना करण्यात आली होती. त्रिशूली जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाशी संबंधित एका अभियंत्याने शाळेची रचना केली होती. यानंतर शाळेची नवीन इमारत २०२२ मध्ये भारताच्या उच्च प्रभावी समुदाय विकास कार्यक्रम अंतर्गत अनुदानाच्या मदतीने बांधण्यात आली होती. मात्र, २६ ऑगस्टच्या महापुराने शाळेची इमारत आणि परिसर उद्ध्वस्त केला.
आता भारताकडून शाळेच्या संपूर्ण पुनर्बांधणीसाठी मदत दिली जाणार असल्याने हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
