Nepal flood Pune tourists stranded: बुधवारी सकाळी नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे पुण्यातील ४ पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी हे चौघेजण पुण्यातून गेले होते. मात्र, यात्रा पूर्ण करून माघारी येत असताना पुराच्या पाण्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. तिबेटमधील जिलाँग शहरात हे चौघे अडकून पडले असून चौघेही सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नेपाळच्या रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नेपाळ सीमेवरील आख्खं इमिग्रेशन कार्यालयच वाहून गेलं. त्यामुळे या यात्रेकरूंना परतीसाठी रस्तेमार्गाने येण्याचा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही, अशीही माहिती पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.

अशी आहेत अडकलेल्या यात्रेकरूंची नावे

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्मिता पवार योगिनी पाटील, दिनेश भोसले व पूजा भोसले अशी पुण्यातील या यात्रेकरूंची नावं आहेत. हा गट पुण्याहून कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघाला होता. नेपाळमधून ही यात्रा पूर्ण करून हे चौघे परतीच्या वाटेवर होते. मात्र, नेपाळ सीमेवरचं कार्यालयच वाहून गेल्यामुळे आता सीमा पार करून माघारी कसं यायचं? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

यात्रेदरम्यान दोघींची प्रकृती बिघडली

दरम्यान, पुण्यातील या चौघांपैकी स्मिता पवार व योगिनी पाटील या दोघींना मानसरोवर येथे अती उंचावरच्या प्रवासामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे त्यांना तातडीने खाली जिलाँग शहरात परत आणण्यात आलं आणि ऑक्सिजन देण्यात आला. इंडियन एक्स्प्रेसनं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, त्या दोघींना अधिकचे वैद्यकीय उपचार देण्याची गरज असून हे उपचार जिलाँग येथील रुग्णालयात उपलब्ध नाहीत.

पुराचे भीषण व्हिडीओ व्हायरल!

इमिग्रेशन कार्यालयच वाहून गेलं, परत यायचं कसं?

कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले यात्रेकरू किंवा इतर कोणत्याही पर्यटकांना नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन कार्यालयातूनच देशात वा देशाबाहेर प्रवास करता येणं शक्य आहे. मात्र, नपाळमधील पुरामध्ये हे आख्खं कार्यालयच वाहून गेल्यामुळे रस्तेमार्गाने परतीचा मार्ग खुंटला आहे. शिवाय, जिलाँग किंवा आसपासच्या परिसरातदेखील परिस्थिती सुरक्षित नसल्यामुळे पुण्यातील या चौघांनी जिलाँगमधून काठमांडूमध्ये एअरलिफ्ट केलं जावं, अशी विनंती केली आहे. काठमांडूमध्ये अतिरिक्त वैद्यकीय उपचार मिळणं शक्य होईल, असंही त्यांचं म्हणणं असल्याचं जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

नेपाळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत १५०० हून अधिक नागरिक बेपत्ता झाले असून २०० जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १३० भारतीय नेपाळच्या पुरात बेपत्ता झाल्याची अधिकृत आकडेवारी नेपाळ प्रशासनाने जारी केली आहे.