Nepal Flood Girl Rescue updates : नेपाळमधील महाप्रलयकर पुरात असंख्य लोकांचे जीव गेले. त्यामुळे बचाव मोहीम सुरू असून अनेकांचे मृतदेह बाहेर काढले जात आहेत. दरम्यान, बुधवारपासून ढिगाऱ्याखाली अडकलेली एका ६ वर्षीय मुलीला शुक्रवारी बचाव पथकांनी जिवंत बाहेर काढलं. सलग तीन दिवस ही चिमुरडी ढिगाऱ्याखाली अडकली होती. या घटनेमुळे देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीची प्रचिती आली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ढिगाऱ्याखालून रडण्याचा आवाज आला अन्…

आपत्ती व्यवस्थापन पथके वाचलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. दरम्यान, या मुलीचा शोध लागला. नाट्यमय सुटकेने आशेचा एक किरण दिसला आहे. ही घटना रसुवा जिल्ह्यातील तिमुरे गावात घडली. वाचलेल्यांचा शोध घेत असताना सशस्त्र पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांना मातीच्या ढिगाऱ्याखालून रडण्याचा क्षीण आवाज ऐकू आला. त्यांनी तातडीने पावले उचलत खोदकाम सुरू केलं आणि त्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू

सुरुवातीला तिच्यावर तिमुरे येथील एपीएफ बॉर्डर आउटपोस्टवर उपचार करण्यात आले, परंतु तिची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने चांगल्या वैद्यकीय सुविधेत हलवणं आवश्यक होते. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी संध्याकाळीच तिला विमानाने काठमांडूला नेण्याची व्यवस्था केली होती, मात्र खराब हवामानामुळे अडथळा निर्माण झाला. बचावकर्त्यांनी शनिवार दुपारपर्यंत तिची प्रकृती स्थिर ठेवली, त्यानंतर हवामान स्वच्छ होताच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तिला काठमांडूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

या बचावाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, युजर्सनी जवानांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. एका युजरने एक्सवर लिहिलं, “शोध कधीही न थांबवणाऱ्या सशस्त्र पोलीस दलाच्या टीमचा आदर.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “जेव्हा सर्व आशा संपल्या होत्या, तेव्हा ती सापडली.”

काही जणांनी तर तिची आपल्या कुटुंबाशी भेट व्हावी यासाठी ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करण्याचं आवाहन केलं आहे. एका युजरने लिहिलं, “अधिकारी आता तिच्या कुटुंबाचा किंवा नातेवाईकांचा शोध घेत आहेत. जर कोणी मनीषा मगरला ओळखत असेल किंवा तिच्या कुटुंबाबद्दल काही माहिती असेल, तर कृपया संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधा.”