Nepal Flood Rescue news update : नेपाळमध्ये पूर, चिखल आणि ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. शनिवार, ५ सप्टेंबर रोजी बचाव पथकांनी आणखी दोन जणांना सुरक्षित बाहेर काढलं, यामुळे गेल्या काही दिवसांत सुखरुप बचाव केलेल्या एकूण वाचलेल्यांची संख्या चार झाली आहे.

एक चीनी कामगार भुयारातून तर एक ६४ वर्षीय महिला कोसळलेल्या घरातून सुखरुप बचावली आहे. या भीषण आपत्तीत अद्यापही हजारो लोक बेपत्ता आहेत. त्रिशूली जलविद्युत प्रकल्पाच्या २२५ मीटर लांब भुयारातून एका चीनी नागरिकाला जिवंत बाहेर काढण्यात आलं. लुहाइताओ असं या कामगाराचं नाव असून, नेपाळी सेना आणि दक्षिण कोरियाच्या आपत्ती निवारण तज्ज्ञांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. त्याला तातडीने हेलिकॉप्टरद्वारे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. या त्रिशूली ३ए जलविद्युत प्रकल्पातून झालेली ही तिसरी यशस्वी सुटका आहे. तर, नुवाकोट शहरात ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या ६४ वर्षीय चंडिका श्रेष्ठ यांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. त्यांना पुढील उपचारासाठी विमानाने काठमांडूला हलवण्यात आले आहे.

२६ ऑगस्ट रोजी हिमनदी फुटल्यामुळे आलेल्या या विनाशकारी पुरात आतापर्यंत किमान १ हजार ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ५ हजारांहून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. देशातील १२ जलविद्युत प्रकल्पांमधील जवळपास ९०० कामगार अद्याप बेपत्ता असून, त्यापैकी सुमारे ५०० कामगार वेगवेगळ्या भुयारांमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ओळख पटवण्यासाठी डीएनए (DNA) नमुने घेतल्यानंतर १,०३० मृतदेहांवर सामूहिक रित्या अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी भारत, चीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाचे तज्ज्ञ नेपाळी पथकांसह दिवसरात्र काम करत आहेत. नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या हजारो विस्थापित लोकांना सुरक्षित आणि आरामदायी घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. “तुमचे आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी आणि भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल”, असे त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले.