Nepal Floods Bhopal Missing Pilgrims: “घर पाण्यात अर्धे बुडाले आहे. आता आम्ही वाचणार नाही. मुलांची काळजी घ्या…” नेपाळमध्ये आलेल्या पुरामध्ये बेपत्ता झालेल्या भोपाळमधील २९ यात्रेकरूंच्या कुटुंबीयांना गुरुवारी सकाळी आलेला हा अखेरचा फोन आता त्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. देवकी अधिकारी यांना सकाळी सुमारे साडेनऊ वाजता नातेवाईकांचा फोन आला. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे जीव वाचवण्यासाठी ते उंच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
देवकी यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीयांनी डोंगरावर चढून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी एका स्थानिकाच्या घरात आश्रय घेतला. मात्र, पुराचे पाणी वाढत गेले आणि ते घरही अर्धे पाण्याखाली गेले. “त्यांनी सांगितले की घर अर्धे पाण्यात बुडाले आहे. आता आम्ही वाचणार नाही. मुलांची काळजी घ्या,” असे देवकी यांनी सांगितले.
शेवटचा संपर्क घराच्या छतावरून
भोपाळमधील कृष्ण-राधिका खनाल आणि रामचंद्र-भावती खनाल अधिकारी तसेच त्यांचे कुटुंबीय श्रावण पौर्णिमेनिमित्त गोसाईंकुंड यात्रेसाठी नेपाळला गेले होते. या गटात एकाच विस्तारित कुटुंबातील २९ जणांचा समावेश होता. यामध्ये भाऊ-भावजय, बहिणी-मेहुणे आणि इतर नातेवाईकांचा समावेश होता. गुरुवारी सकाळी त्यांनी कुटुंबीयांना आपण एका घराच्या छतावर आश्रय घेतल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
कुटुंबीयांनी पुन्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला. काही काळ फोन लागत होता, मात्र समोरून कोणताही आवाज येत नव्हता. त्यानंतर फोनचाही संपर्क तुटला. यानंतर कोणताही संपर्क झालेला नाही. एकूण २९ जण गेले होते आणि ते सर्व आमच्या ओळखीचेच आहेत. आतापर्यंत त्यांच्यापैकी कोणाबाबतही आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली नाही,” असे कुटुंबीयांनी सांगितले.
नेपाळ-तिबेटमध्ये मोठी जीवितहानी
नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा ५३८ वर पोहोचला असून ९७७ जण अद्याप बेपत्ता आहेत. सुमारे ३,७४२ जणांची सुटका करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या बाजूला असलेले सुमारे ४०० भारतीय सुरक्षित आहेत. मात्र, सुमारे ३२० भारतीय आणि १०० हून अधिक भारतीय वंशाचे नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचे मंत्रालयाने सांगितले.
भोपाळमधील या २९ यात्रेकरूंच्या कुटुंबीयांसाठी मात्र आता प्रत्येक फोनकॉल आशेचा किरण ठरत आहे. त्यांच्या नातेवाईकांचा ठावठिकाणा लागण्याची प्रतीक्षा कुटुंबीय करत आहेत.
