ठमांडू : ‘मला वाटले, आता माझा मृत्यू अटळ आहे.’ महापुरातून बचावलेल्या दीपक तामांग यांच्या या शब्दांत या महाभयंकर आपत्तीची तीव्रता जाणवते. भोटेकोशी नदीच्या काठावरील तिमुरे बाजारात अचानक पाणी, चिखल आणि दगडांचा प्रचंड लोट आला. जीव वाचविण्यासाठी तामांग यांनी डोंगराची वाट धरली. काटेरी झुडपे आणि रानटी वनस्पतींना पकडत ते वर चढले; अनेकदा घसरून पडले. डोंगरमाथ्यावर पोहोचून खाली पाहिले असता त्यांच्या डोळ्यांसमोर मित्र पुरात वाहून जाताना दिसले.

सिंधुपालचोक जिल्ह्यातील रहिवासी असलेले तामांग तिमुरे येथे असताना हा महापूर आला. घराबाहेर पडून डोंगराकडे धाव घेतली, तेव्हा काही घरे आधीच पुराच्या तडाख्यात कोसळली होती. मागे पुराचा प्रचंड प्रवाह आणि समोर भिंतीसारखा डोंगर अशी त्यांची अवस्था झाली होती. डोंगर चढताना ते अनेकदा घसरले. काटेरी झुडपे आणि रानटी वनस्पतींना पकडून त्यांनी वर जाण्याचा प्रयत्न केला. ‘जगणे आणि मरणे यांच्यातील ती माझी शेवटची धाव होती,’ असे त्यांनी सांगितले.

डोंगरावर पोहोचल्यानंतर पुराच्या लाटेत अनेक जण वाहून जाताना त्यांनी पाहिले. त्यात त्यांचे मित्रही होते. मात्र, त्यांच्या डोळ्यांसमोर मित्र वाहून जात असताना ते काहीही करू शकले नाहीत. जंगलातील लाकूड साठविण्याच्या जुन्या गोदामात त्यांनी रात्रीचा आसरा घेतला. तेथे अन्य अनेकांनीही जीव वाचवून आश्रय घेतला होता. पाऊस सुरूच असताना त्यांनी रात्र काढली आणि सुमारे २४ तासांनी त्यांची सुटका झाली.

६० फूट उंच लाट नाग किंवा फणा काढलेल्या सापासारखी

या आपत्तीत अडकलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकी दाम्पत्याची कहाणीही थरकाप उडवणारी आहे. अंजना राजा आणि पट्टाभिरामन व्यंकटेशन हे नेपाळमध्ये अडकले होते. बचावानंतर त्यांना विमानाने काठमांडूला हलविण्यात आले. ‘मला वाटले, मी मरणारच,’ असे राज यांनी सांगितले. व्यंकटेशन यांच्या मते, त्यांच्याकडे येणारा चिखल-दगडांचा लोट ६० ते ७० फूट उंच होता आणि तो सुनामीसारखा दिसत होता. सुरुवातीला तो पाण्याचा प्रवाह आहे की आगीचा, हेही त्यांना कळत नव्हते. राज यांच्या म्हणण्यानुसार, पाणी आणि चिखलाची लाट ५० ते ६० फूट उंच होती आणि ती नाग किंवा फणा काढलेल्या सापासारखी त्यांच्या दिशेने येत होती. पुराचा लोट दिसताच राज यांनी पतीच्या शर्टाची कॉलर पकडून ‘पळा’ असे ओरडले. दोघांनी बसमधून उडी मारली आणि उंच जागेकडे धाव घेतली. या अनुभवामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे सांगताना त्यांनी ‘चांगले राहा, चांगले करा, चांगला विचार करा आणि बाकी सर्व देवावर सोडा,’ असे त्यांनी म्हटले.