वृत्तसंस्था, काठमांडू : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या पुरामधील मृतांची संख्या ९३९ इतकी झाली असून अजूनही चार हजारांपेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत, अशी माहिती अधिकार्यांनी सोमवारी दिली. बेपत्ता स्थानिक आणि परदेशी नागरिकांचा शोध सुरू असून सातत्याने मृतदेह हाती लागत असल्यामुळे मृतांचा आकडा वाढत आहे.
नेपाळच्या ‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ने (एनडीआरआरएमए) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चितवन जिल्ह्यतून २७९, नवलपारसी पूर्वमधून २१६, नवलपारसी पश्चिममधून १६८, गोरखा जिल्ह्यतून ६५ मृतदेह सापडले आहेत. त्याबरोबरच नुवाकोट जिल्ह्यत ९५, धडिंगमध्ये ५५, तनाहूमध्ये ३८ आणि रसुवा जिल्ह्यत २३ मृतदेह हाती लागले. एकूण ४,२४७ लोक बेपत्ता असून त्यामध्ये ९९ सुरक्षा सैनिकांचा समावेश आहे.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली की, ३९ देशांतील ५९१ नागरिक बेपत्ता आहेत. यामध्ये भारत, अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, स्पेन, बेल्जियम, जर्मनी, इटली, माल्टा, तुर्की, स्वित्झर्लंड आणि पोर्तुगाल या देशांचा समावेश असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. पूरग्रस्त भागांमधून आतापर्यंत १० हजारांपेक्षा जास्त लोकांची सुटका करण्यात यश आले असून त्यामध्ये ३२३ परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
नेपाळ आणि तिबेटला जोडणारी भोटेकोशी मार्गिका, तसेच रसुवागाधी येथे सीमा जोडणारा भाग वाहून गेला आहे. दरम्यान, नेपाळला पुरेशी सामग्री नसल्याचा फटका बसत आहे. अडकलेल्यांना वाचवताना आणि मृतदेह बाहेर काढताना सुरक्षा सैनिकांना प्राणाची बाजी लावावी लागत आहे.
राज्यातील ६७ पर्यटक बेपत्ताच
मुंबई : नेपाळमध्ये राज्यातील ४०५ पर्यटक अडकले असून त्यापैकी ६७ नागरिक बेपत्ता आहेत. पुरामध्ये अडकलेल्या २६२ जणांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर उर्वरित ७६ संपर्कात आहेत. संपर्क न झालेल्या पर्यटकांच्या शोधासाठी केंद्र सरकारचे विशेष पथक काठमांडू येथे दाखल झाले आहे.
मुख्याध्यापकाने ९०० विद्यार्थ्यांना वाचवले
बिदूर : त्रिशूली नदीच्या खोर्यात पूराचे पाणी वेगाने वाढत असल्याची माहिती मिळताच त्रिभुवन त्रिशूली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांनी काही मिनिटांत शाळा रिकामी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ९०० हून अधिक विद्यार्थ्यांना आणि कर्मचार्यांना सुरक्षित उंच ठिकाणी हलविले. विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी पोहोचताच काही क्षणांत शाळेची तीन मजली इमारत पाणी, चिखल, मोठे दगड आणि ढिगार्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली. घटना घडली त्या सकाळी शाळेत वर्ग सुरू झाले होते. दवाडी स्वत: एका वर्गात होते. त्यांना पुराचे पाणी वेगाने वाढत असल्याची माहिती मिाळल्यांतर त्यांनी वेगाने हालचाली केल्या. दरम्यान, दोन कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत.
विद्युत प्रकल्पांमधील कर्मचार्यांच्या सुटकेचे प्रयत्न
जलविद्युत प्रकल्पांमध्ये अडकलेल्या ९३३ कर्मचार्यांपर्यंत पोहोचण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे नेपाळच्या अधिकार्यांनी सांगितले. नेपाळी बचाव पथकांच्या मदतीला भारतीय आणि चिनी तज्ज्ञ पोहोचले आहेत. अधिकार्यांनी सांगितले की, ११ प्रकल्पांमध्ये एकूण ९३३ कर्मचारी अडकल्याची भीती आहे. यापैकी बहुतेक प्रकल्प पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या रसुवा आणि नुवाकोट या जिल्ह्यंमध्ये आहेत. बचाव पथकांनी प्रसिद्ध केलेली छायाचित्रे आणि चित्रफितींमध्ये यंत्रसामग्रीच्या सहाय्याने चिखल-माती उकरण्याचे काम सुरू आहे. तसेच चिखलमाती आणि दगड हटवण्यासाठी नियंत्रित स्फोटही केले जात आहेत. दरम्यान, सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार पुरामुळे नेपाळमधील किमान २३ जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले असून त्यापैकी १२ पूर्णपणे नष्ट झाले आहेत.
अन्य घडामोडी
- भूकंपामुळे नव्हे तर हिमनदीचा प्रचंड कडा कोसळूनच पूर, तज्ज्ञांची माहिती
- मृतदेहांच्या डीएनएचे विश्लेषण करण्यासाठी भारतातून १८ तज्ज्ञांचे पथक नेपाळमध्ये दाखल
- नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी चीनची २२ लाख डॉलरची मदत; तर संयुक्त अरब अमिरातीने ८३ टन मदतसामग्री पाठवली
- तिबेटमध्ये २३ देशांतील २६१ परदेशी नागरिक बेपत्ता असल्याची चीनची माहिती; नेपाळमध्ये १०० चिनी बेपत्ता
- तिबेटमध्ये मृतांचा आकडा १६ झाला असून जवळपास ५५० लोक बेपत्ता आहेत
- रुग्णालयांमध्ये अधिकार्यांनी आता मृतदेहांची ओळख पटवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
- रुग्णालयांच्या भिंतींवर मृतदेहांची छायाचित्रे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
