वृत्तसंस्था, काठमांडू
मध्य नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण पुरानंतर शोध व बचावकार्याला वेग आला असून आतापर्यंत ५७९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही सुमारे दोन हजार लोक बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शोध व बचावकार्यामध्ये ७,४५१ सुरक्षा सैनिक सहभागी झाले आहेत. त्यामध्ये नेपाळ लष्कराच्या २,३९१ सैनिकांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचवेळी भोटेकोशी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे नव्याने पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नेपाळच्या ‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ने (एनडीआरआरएमए) सांगितले की, पूरग्रस्त भागांमध्ये चिखलयुक्त पाण्याची पातळी वाढल्याने त्याच भागात पुन्हा पूर येण्याचा धोका वाढला आहे. शोध व बचावकार्यात सहभागी असलेल्या लोकांनी, तसेच वेगवेगळ्या कारणांमुळे भोटेकोशी आणि त्रिशुली नदीच्या परिसरात राहणार्या लोकांनी अतिशय सतर्क राहावे आणि कोणताही धोका जाणवला तर तातडीने सुरक्षित स्थळी जावे, अशी सूचना ‘एनडीआरआरएमए’ने केली आहे.
आतापर्यंत ५७९ मृतदेह सापडले
नेपाळच्या आठ जिल्ह्यंमधून आतापर्यंत ५७९ मृतदेह हाती लागल्याची माहिती नेपाळच्या पोलिसांनी दिली. नवलपारसी पूर्व जिल्ह्यत १५४ मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक जीवितहानी चितवन जिल्ह्यत झाल्याचे दिसत असून तेथे २३३ मृतदेह हाती लागली आहेत. अद्याप १,९२४ लोक बेपत्ता आहेत. नेपाळच्या पर्यटन मंडळाने माहिती दिली आहे की, आतापर्यंत ८५ भारतीयांसह १२१ परदेशी पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. त्यात ९ दक्षिण कोरियाचे आणि १६ चीनचे नागरिक आहेत.
किमान १,९२४ बेपत्ता
बुधवारी सकाळी पूर आल्यापासून किमान १,९२४ जण बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. त्यामध्ये ८६ सुरक्षा सैनिक, ५१७ परदेशी पर्यटक आणि १२७ नेपाळी प्रवाशांचा समावेश आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांहून ४,४५१ जणांची सुटका करण्यात आली आहे. विविध जलविद्युत प्रकल्पांमध्ये अडकलेल्या १९१ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तर, १०१ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नदीतील तलावांवर लक्ष
काठमांडू : तिबेट-नेपाळ सीमेवर हिमस्खलन होऊन किंवा हिमनदीचा मोठा कडा कोसळून नेपाळमध्ये पूर आल्यानंतर आता नदीमध्ये तयार झालेल्या दोन तलावांनुळे नव्याने पूर येण्याचा धोका आहे. या तलावांवर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकार्यांनी दिली. यापैकी नदीच्या वरील भागात असलेला तलाव आकाराने वाढत आहे, त्यातून पाणी बाहेर पडण्यास जागा दिसत नाही. त्यामुळे त्यातील पाण्याचा दबाव वाढत जाण्याचा धोका आहे.
दोन्ही तलाव पूर्ण कोरडे होईपर्यंत पुराचा धोका कायम राहील, अशी माहिती एका अधिकार्याने दिली. शुक्रवारी एक तलाव भरून वाहू लागल्यामुळे भीती वाढली आहे, त्याचवेळी दुसर्या तलावातून पाण्याचा निचरा होत असल्याचेही चिनी पथकाने केलेल्या चित्रीकरणात दिसत आहे. हिमस्खलनानंतर त्याबरोबर वाहत आलेला बर्फ, दगड, चिखल यामुळे नदीच्या पाण्यात अवरोध तयार होऊन हे तात्पुरते तलाव निर्माण झाले आहेत. हे दोन्ही तलाव हिमकडा कोसळला त्या जागेपासून जवळ असल्याचे उपग्रहाने उपलब्ध करून दिलेल्या प्रतिमांमधून दिसत आहे. चीनच्या मदत पथकाने गुरुवारी या तलावांचे चित्रीकरण केले. त्यामध्ये खोर्यात मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी जमा झाल्याचे दिसत आहे.
चिनी अधिकार्यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळच्या छोचेन खोला आणि पुरेपू त्सेंगपो या नद्यांच्या संगमाजवळ आधी एक तलाव निर्माण झाला. त्यानंतर त्याजवळ आणखी एक तलाव निर्माण झाल्याचे उपग्रहाने पाठवलेल्या छायाचित्रांमधून दिसत आहे. छोचेन खोला आणि पुरेपू त्सेंगपो या दोन्ही नद्या तिबेटमध्ये उगम पावतात. पुढे नेपाळमध्ये त्यांचा संगम होतो आणि त्याने तयार झालेली उपनदी भोटे कोशी नदीला जाऊन मिळते.
ट्रकची १६ किमी रांग
महाराजगंज (उत्तर प्रदेश): पुरामुळे रस्तेमार्गे होणार्या भारत-नेपाळ व्यापाराला फटका बसला आहे. नेपाळला निघालेले शेकडो ट्रक उत्तर प्रदेशच्या सोनौलु सीमेवर अडकून पडले आहेत. ट्रकची ही रांग जवळपास १६ किमी लांब असल्याचे सांगण्यात आले. ट्रकबरोबर प्रवासी वाहनेही अडकून पडली आहेत.
पूरग्रस्तांसाठी रक्षाबंधन
काठमांडू : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामान्य लोक आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. नेपाळच्या मंदिरामध्ये पूरग्रस्तांसाठी देणग्या गोळा केल्या जात आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिक मंदिरांमध्ये येऊन एकमेकांना राखी बांधत आहेत आणि देणगीच्या डब्यांमध्ये पैसे जमा करत आहेत.
अन्य घडामोडी
– दुर्गम भागांमध्ये अडकलेल्यांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरचा वापर, नदीकाठ आणि नद्यांंच्या प्रवाहाच्या खालील बाजूलाही शोध सुरू
– नवनवीन मृतदेह दाखल होत असल्यामुळे रुग्णालयांमधील शवागारांची क्षमता अपुरी पडत आहे.
– पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या रसुवा आणि नुवाकोटमधील लोकांचे मृतदेह चितवन, तानाहुन, नवलपारसी, गोरखा जिल्ह्यंत सापडत आहेत
– बिहारमधील अनेक नद्यांची पातळी वाढल्याने पुराचा धोका; नेपाळमधून वाहून आलेले चार मृतदेह उत्तर प्रदेशात सापडले.
– किमान ९३,००० लोक पूरस्थितीने प्रभावित आहेत, असा अंदाज ‘रेड क्रॉस’ने व्यक्त केला आहे. तर १७,०० मुलांना तातडीची मदत असल्याचे ‘युनिसेफ’ने सांगितले.
