नेपाळच्या महाप्रलयात शेकडो जणांचा बळी गेला, तर २ हजार पेक्षा जास्त लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरूच आहे. या महापुरामुळे अनेक गावं भुईसपाट झाले आहेत. या पुरात अनेक इमारती, पूल कोसळले आहेत. पुराबरोबर आलेल्या माती आणि दगड-धोंड्यांमुळे मोठा विध्वंस झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पुराच्या पाण्याने चारही बाजूने वेढलेलं असतानाही एक दोन मजली इमारत (ग्रीन हाऊस) तग धरुन उभा असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे या ‘ग्रीन हाऊस’ची मोठी चर्चा सुरू आहे.

पुराच्या भयंकर प्रवाहातही या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काही नागिरक जीव मुठीत घेऊन थांबलेले व्हिडीओत दिसून आले होते. या पुरामुळे संपूर्ण गावं, पूल, वाड्या, वस्त्या वाहून गेल्या. मात्र, अशा परिस्थितीत देखील या ‘ग्रीन हाऊस’ने तग कसा धरला? एवढ्या मोठ्या महापुरात या घराचा निभाव कसा लागला? याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. अनेकांनी हे घर बांधणाऱ्या इंजिनिअर्सचं कौतुक केलं आहे. दरम्यान, आता या ‘ग्रीन हाऊस’मध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘ग्रीन हाऊस’मधील कुटुंबीयांनी काय म्हटलं?

नेपाळच्या महापुरात हे ‘ग्रीन हाऊस’ नेमकं कसं वाचलं? याचा थराराक अनुभव या घरात राहणाऱ्या रहिवाशी लक्ष्मी पांडे आणि प्रकाश पांडे प्याकुरेल यांनी बरखा दत्त यांनी घेतलेल्या Mojo Story च्या मुलाखतीत बोलताना सांगितला आहे. तुमच्या घरात नेमकं काय जादू होती? की घर बांधलेल्या इंजिनिअर्सची ही कमाल आहे? या प्रश्नावर बोलताना रहिवाशी लक्ष्मी पांडे यांनी म्हटलं की, “कदाचित इंजिनिअर्सची ही कमाल असेल आणि आमचं नशीब देखील चांगलं होतं. आम्ही दररोज देवाची पूजा करतो, त्यामुळे देवानेच आम्हाला वाचवलं असेल. मी दररोज हनुमान चालीसा वाचते. ज्या दिवशी महापूर आला, त्या दिवशी देखील मी हनुमान चालीसा वाचून पुढे दुकानात गेले होते. त्यामुळे मला वाटतं की या महापूरातून आम्ही वाचलो ही देवाचीच कृपा आहे. आम्हाला ज्यांनी वाचवलं, त्यांचे मी आभार मानते”, असं लक्ष्मी पांडे यांनी म्हटलं आहे.

“मी लाल बॅग घेऊन घराच्या छतावर जाऊन ती बॅग वर फिरवत मदत मागत होते. माझ्या पतीने आम्हाला सर्वांना वाचवलं. माझ्या सिंदूरनेच मला वाचवलं. त्यामुळे या महापुरात सिंदूरची ताकद दिसली. माझं घर व्हायरल झालं, पण आमचं सर्वांचं मोठं नुकसान झालंय. घराच्या जवळ आमचं एक दुकान होतं, ते देखील वाहून गेलं. आमचं १० ते १५ कोटींचं नुकसान झालं आहे. आमची २५ ते ३० वर्षांची मेहनत सगळी पाण्यात गेली. आम्ही वाचलो, आता आम्ही आमचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करणार आहोत”, असं लक्ष्मी पांडे यांनी म्हटलं आहे.

“प्रकाश पांडे प्याकुरेल यांनी म्हटलं की, “जेव्हा महापूर आला आणि ते पाणी पाहून खूप भिती वाटली होती. आम्हाला असं वाटलं होतं की आता आपण वाचणार नाही. आम्हाला वाटलं की आता सगळं संपलंय. ही घटना घडली तेव्हा घरात आम्ही सर्वजण होतो. आई-वडील, माझी मुलगी आणि आम्ही दोघेजण होता”, अशी प्रतिक्रिया प्रकाश पांडे प्याकुरेल यांनी दिली आहे.

नेपाळच्या महापुरात ‘ग्रीन हाऊस’चा व्हिडीओ व्हायरल

नेपाळमध्ये जो महाप्रलय आला, त्यात इमारतीच्या इमारती वाहून गेल्या. अत्यंत भयंकर व्हिडीओ समोर येत आहेत. यातच नेपाळच्या ग्रीन हाऊसचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. नेपाळच्या महाप्रलयात ग्रीन हाऊस वाहून गेलं नाही, हे घर सुरक्षित राहिलं. या घराच्या टेरेसवर कुटुंब गेल होतं ते सगळेजण वाचले आहेत. तसंच या महाप्रलयात हे घरही वाचलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या ग्रीन हाऊसचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनेक लोक या ग्रीन हाऊसचे व्हिडीओ पोस्ट करत आहेत. या घराचं इंजिनिअरींग ज्या इंजिनिअरने केलं त्याला कडक सॅल्युट अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकांनी दिल्या आहेत.