नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचे धक्कादायक अनुभव आता समोर येऊ लागले आहेत. नेपाळमधली परिस्थिती अजूनही गंभीर असून सीमा भागातील एक मोठा जलाशय फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या तीन दिवसांत नेपाळमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बचावकार्य हाती घेतलं आहे. अजूनही १ हजाराहून अधिक नागरिक, पर्यटक पुरात बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये भारतातून गेलेल्या जवळपास ३०० जणांचा समावेश आहे. आत्तापर्यंत या पुरात ३५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी नेपाळकडून जाहीर करण्यात आली आहे.
या भीषण पुराच्या जबड्यातून अगदी थोडक्यात जीव वाचलेले कर्नाटकचे मल्लिनाथ कोलकुंडी सांगतात, “काहीतरी आमच्या दिशेनं घोंघावत येत असल्याचा एक मोठा आवाज आम्हाला आला. त्यावर नेमकं काय घडतंय हे कळायच्या आत अगदी काही सेकंदांमध्ये आमच्या समोर जे काही होतं ते सगळं पाण्याच्या मोठ्या प्रवाहात वाहून गेलं”. ५० वर्षीय मल्लिनाथ आणि त्यांचे ३० वर्षीय जावई संगमेश हे कलबुर्गी जिल्ह्यातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघाले होते. नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या या महापुरात निसर्गाचं अक्राळ-विक्राळ रुप पाहायला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया पुरात अडकलेल्या नागरिकांकडून येत आहेत.
“आम्हाला समोर एक पाण्याची भलीमोठी भिंतच दिसू लागली…”
बुधवारी सकाळी नेपाळ-तिबेट सीमेवर हा महाप्रलय अवतरला. मल्लिनाथ व त्यांचे जावई त्याच दिवशी सकाळी ६ वाजता बसमध्ये चढले. दोन बसेस कैलास मानसरोवराकडे जाण्यासाठी नेपाळ-तिबेट सीमेच्या दिशेनं निघाल्या. मल्लिनाथ सांगतात, सकाळी ९.३० च्या सुमारास महापुराचं भयंकर रूप त्यांना जाणवू लागलं.
Might be the most insane disaster footage I have ever seen.
— ₿IGRYAN (@BigRyan) August 26, 2026
You can see people fleeing moments before the flash flood (tidal wave) wipes out the entire village.
Prayers and good energy to the people of Nepal ??? pic.twitter.com/GXkRHvSLQA
“आमच्या बसेस समोर दिसणाऱ्या पुराच्या पाण्यापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर होत्या. आम्हाला समोर पाण्याची एक भलीमोठी भिंतच दिसू लागली. ते बघताच आमच्या ड्रायव्हरनं काही क्षणांत बस पूर्णपणे वळवली आणि उंचावरच्या ठिकाणाच्या दिशेनं चालवली. त्यामुळेच आमचे प्राण वाचले. तिथे कुणीच काहीच करू शकत नव्हतं. फक्त ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे आमचे प्राण वाचले. बहुतेक लोकांना समोर जे घडतंय त्यावर काही प्रतिक्रिया द्यायचीही संधी मिळाली नाही”, अशा शब्दांत मल्लिनाथ यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना तो धक्कादायक अनुभव कथन केला.
“त्यांचे मृतदेहदेखील सापडण्याची शक्यता कमी वाटतेय”
मल्लिनाथ यांच्या बससमोरच्या दोन बसेस त्यांच्या डोळ्यांसमोर पाण्यात वाहून गेल्याचं ते सांगतात. “अगदी काही सेकंदांत समोरचं सगळंकाही वाहून गेलं होतं. आमच्या पुढे यात्रेकरूंनी भरलेल्या दोन बसेस पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. मला वाटत नाही त्यांचे मृतदेहदेखील त्या ठिकाणाहून आता सापडू शकतील”, असं ते म्हणाले. “आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि ज्या इमिग्रेशन कार्यालयातून आम्हाला जायचं होतं, त्या सगळ्याचं अस्तित्वच पूर्णपणे नामशेष झालं आहे. देवाच्या कृपेनंच आम्ही वाचलो”, असा अनुभव मल्लिनाथ यांनी सांगितला.
६४ किलोमीटर पसरलेला राडारोडा, दगड आणि बर्फ!
नेपाळमध्ये पुराचा तडाखा बसल्यानंतरचं दृश्य विदारक असल्याचा अनुभव बचावलेले नागरिक सांगत आहेत. जवळपास ६४ किलोमीटरपर्यंतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल, पाणी, दगड आणि बर्फ पसरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गात किंवा बाजूला येणारे हॉटेल, रस्ते आणि सीमा भागातील सर्व इमारती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.
