नेपाळमध्ये आलेल्या भीषण महाप्रलयात आत्तापर्यंत तब्बल ५३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नेपाळ सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच अद्यापही शेकडो नागरिक बेपत्ता आहेत. या महापुरामुळे अनेक गावं भुईसपाट झाले आहेत. नेपाळमधील या महापुराच्या घटनेनंतर संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

नेपाळमधील या विनाशकारी पुरामुळे शेकडो भारतीय देखील बेपत्ता आहेत, तर अनेकजण अद्यापही अडकलेले आहेत. सध्या नेपाळच्या सैन्यांकडून, पोलिसांकडून आणि बचाव यंत्रणांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. नेपाळमधील या पुरामध्ये नेमकं किती भारतीय नागरिक अडकले आहेत आणि किती भारतीय नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत? याची माहिती शुक्रवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

३२० भारतीय अद्यापही बेपत्ता आहेत, तर ४०० जण सुरक्षित असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी दिली आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे. तसेच पुराचा फटका बसलेल्या इतर शेकडो लोकांशी संपर्क साधण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे.

रणधीर जयस्वाल यांनी काय सांगितलं?

नेपाळ-चीन सीमेवरील चीनच्या बाजूला अडकलेले ४०० पेक्षा जास्त भारतीय नागरिक सुरक्षित आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी दिली. तसेच नेपाळमधील महापुराचा फटका बसलेल्या शेकडो लोकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू असल्याची माहिती जयस्वाल यांनी सांगितली.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, बीजिंगमधील भारतीय दूतावास हे स्थानिक अधिकारी, टीम लीडर्स आणि ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून बाधित क्षेत्रातील अनेक भारतीयांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दूतावासाकडून हेल्पलाइनच्या माध्यमातून संबंधित नागरिकांचे कुटुंबीयही संपर्क साधत आहेत. वास्तविक पाहता तिथे जवळपास ४०० भारतीय नागरिक आहेत. मात्र, आपले दूतावास त्यांच्यापैकी अनेकांशी आणि त्यांच्या टीम लीडर्स आणि ट्रॅव्हल एजंटशी संपर्कात आहेत, असं जयस्वाल यांनी म्हटलं आहे.

२१ नागरिक मायदेशी परतले

दरम्यान, नेपाळमधील पुरामुळे बाधित झालेल्या भारतीयांपैकी ९६ जण आधीच पोहोचले आहेत, तर काठमांडूमध्ये पोहोचलेल्या २१ जणांचं दिल्लीत आगमन झालं आहे. तमिळनाडूतील या २१ जणांचं इंडिगोच्या विमानाने दिल्लीत आगमन झालं आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने हे देखील स्पष्ट केलं की, ‘त्रिशूल वन’ या ठिकाणी कार्यरत असलेल्या ६३ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.

चीनमध्ये अडकलेल्या ४०० भारतीयांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न

“चीनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता निश्चित करण्यात आली आहे. आमचे दूतावास चीनमधील स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. तिथे असलेल्या लोकांना बाहेर कसं काढता येईल, यावर ते काम करत आहेत. हे सर्व ४०० किंवा त्याहून अधिक लोक सुरक्षित आहेत”, असं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.