नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने मोठ्या प्रमाणावर हाहाकार उडवला आहे. या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या भारतीयांबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. नेपाळमधील पूरग्रस्त भागांतून अद्याप ३२० भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची अधिकृत माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिली आहे. याशिवाय भारतीय वंशाचे १०० हून अधिक नागरिक अद्याप संपर्काबाहेर आहेत.

नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारत सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मृतांचा आकडा ६२६ वर; बचावकार्य सुरूच

नेपाळमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही शोध आणि बचावकार्य सुरू असून, आतापर्यंत मृतांचा एकूण आकडा ६२६ वर पोहोचला आहे. भोटेकोशी नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. या संकटामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली असून, सुमारे १,९२४ लोक अद्यापही बेपत्ता आहेत. यामध्ये ५१७ परदेशी पर्यटकांचा समावेश आहे.

नेपाळच्या आठ जिल्ह्यंमधून आतापर्यंत ६२६ मृतदेह हाती लागल्याची माहिती नेपाळच्या पोलिसांनी दिली. नवलपारसी पूर्व जिल्ह्यत १५४ मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक जीवितहानी चितवन जिल्ह्यत झाल्याचे दिसत असून तेथे २३३ मृतदेह हाती लागली आहेत. अद्याप १,९२४ लोक बेपत्ता आहेत. नेपाळच्या पर्यटन मंडळाने माहिती दिली आहे की, आतापर्यंत ८५ भारतीयांसह १२१ परदेशी पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. त्यात ९ दक्षिण कोरियाचे आणि १६ चीनचे नागरिक आहेत.

किमान ९३,००० लोक पूरस्थितीने प्रभावित आहेत, असा अंदाज ‘रेड क्रॉस’ने व्यक्त केला आहे. तर १७,०० मुलांना तातडीची मदत असल्याचे ‘युनिसेफ’ने सांगितले.

तिबेट सीमेवरील ४०० भारतीय भाविक सुरक्षित

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले सुमारे ४०० भारतीय नागरिक चीनच्या (तिबेट) सीमेवर अडकले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे हे सर्व भाविक पूर्णपणे सुरक्षित आहेत.

तिकडे टेलिफोन आणि संपर्क यंत्रणा सुरू असल्याने हे सर्व नागरिक आपल्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. भारतीय दूतावास त्यांचे गटप्रमुख आणि टूर ऑपरेटर्सशी सतत बोलून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

२१ भारतीय दिल्लीत परतले, ६३ कामगारांचीही सुटका

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्याला मोठे यश मिळत आहे:

  • तमिळनाडूचे २१ नागरिक दिल्लीत दाखल: नेपाळमधील पूरग्रस्त भागातून सुटका करण्यात आलेले तमिळनाडूतील २१ नागरिक इंडिगोच्या विमानाने सुरक्षितपणे दिल्लीत पोहोचले आहेत. काठमांडूमध्ये भारतीय प्रमुखांनी (दूताने) स्वतः त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती.
  • त्रिशूली प्रकल्पातील ६३ कामगार सुरक्षित: त्रिशूली-१ जलविद्युत प्रकल्पात अडकलेल्या ६३ भारतीय कामगारांना गुरुवारी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
  • चीनच्या सीमेवरून नेपाळमध्ये आगमन: चीनच्या बाजूला अडकलेले ९६ भारतीय नागरिक जमिनीच्या मार्गाने सुरक्षितपणे नेपाळच्या सीमेत दाखल झाले आहेत. आता त्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी २४ तास कंट्रोल रूम कार्यरत

रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, बेपत्ता नागरिकांची संख्या ३२० असली तरी ही आकडेवारी सतत बदलत आहे. सध्या अनेक याद्यांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. भारतीय वंशाचे जे १०० लोक बेपत्ता आहेत, त्यांच्याकडे इतर देशांचे नागरिकत्व असू शकते आणि ते मानसरोवर यात्रेसाठी गेले असण्याची शक्यता आहे.

या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांना मदत पुरवण्यासाठी नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालय, काठमांडूमधील भारतीय दूतावास आणि बीजिंगमधील भारतीय दूतावास या तिन्ही ठिकाणी २४ तास कंट्रोल रूम सुरू करण्यात आल्या आहेत. भारत सरकार नेपाळला सर्व प्रकारची मदत पुरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

शोध व बचावकार्य

शोध व बचावकार्यामध्ये ७,४५१ सुरक्षा सैनिक सहभागी झाले आहेत. त्यामध्ये नेपाळ लष्कराच्या २,३९१ सैनिकांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचवेळी भोटेकोशी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे नव्याने पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.