एकीकडे संपूर्ण नेपाळ पुराच्या विनाशाने हादरला असून नागरिक आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहेत. मात्र, याच काळात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापुराच्या प्रचंड वेगात वाहून आलेली एका बँकेची तिजोरी फोडून लाखो रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी पोलिसांनी २९ जणांना ताब्यात घेतले आहे.

पुराच्या पाण्यात वाहून आली बँकेची तिजोरी

पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की, ही तिजोरी थेट धादिंग जिल्ह्यातील ‘गळछी’ गावाजवळील पेलखू खोला येथे त्रिशुली नदीच्या पात्रात येऊन अडकली. नदीपात्रात अडकलेली तिजोरी पाहून स्थानिकांनी मदतीऐवजी ती लुटण्याची संधी साधली. काही लोकांनी एकत्र येऊन ही तिजोरी फोडली आणि त्यातील रोकड लंपास केली.

पोलिसांची कारवाई; तब्बल ५७ लाखांची रोकड जप्त

या घटनेची माहिती मिळताच धादिंग पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी परिसरात तपास मोहीम राबवली. प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी संशयावरून २९ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून आणि झडतीदरम्यान पोलिसांनी तब्बल ९२ लाख ६८ हजार ५०५ नेपाळी रुपये (सुमारे ५७ लाख भारतीय रुपये) जप्त केले आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी १९ ते ४९ वयोगटातील असून, यामध्ये गळछी, सिद्धलेक, चितवन आणि पर्सा भागातील रहिवाशांचा समावेश आहे. जप्त केलेली रोकड नेमकी कोणत्या बँकेची आहे आणि या दरोड्यात आणखी किती लोकांचा हात आहे, याचा सखोल तपास नेपाळ पोलिस करत आहेत.

पुरातील मृतदेहावरील सोन्याचे दागिनेही लुटले

नेपाळमधील या आपत्तीदरम्यान केवळ तिजोरी लुटल्याचीच नाही, तर माणुसकीला लज्जास्पद वाटेल अशी आणखी एक घटना समोर आली आहे. नारायणी नदीत वाहून आलेल्या एका महिला पूरग्रस्ताच्या मृतदेहावरून सोन्याचे डुल (कानटोप) चोरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मृतदेहावरून दागिने काढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना अटक केली.

महापुरात २५०० हून अधिक नागरिक बेपत्ता; मृतांचा आकडा ६०० पार

नेपाळमधील ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने’ (NDRRMA) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुरामुळे झालेल्या विनाशाची आकडेवारी अतिशय भयावह आहे:

  • एकूण मृत्यू: ६२६ जणांचा मृत्यू निश्चित झाला आहे.
  • बेपत्ता नागरिक: तब्बल २,४२६ नेपाळी नागरिक अद्याप बेपत्ता आहेत.
  • बेपत्ता परदेशी नागरिक: ५१७ परदेशी पर्यटकांचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.

महापूर येऊन तीन दिवस उलटले तरीही शोध आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. एकीकडे संपूर्ण देश या नैसर्गिक आपत्तीविरुद्ध लढा देत असताना, दुसरीकडे घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे नेपाळमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.