Nepal floods mortuary crisis : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण पुरानंतर मृतांची संख्या वाढत असतानाच प्रशासनासमोर आता मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. विविध जिल्ह्यांमधील शवागरांची क्षमता संपत असून, पुराच्या पाण्यात वाहून गेलेले मृतदेह रासुवा आणि नुवाकोटपासून दूरच्या चितवन, तनाहुन, गोरखा आणि नवलपरासीपर्यंत आढळत आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
या पुरात आतापर्यंत किमान ५३८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. वाढत्या मृतदेहांमुळे प्रशासनाने शेजारील जिल्ह्यांमध्ये मृतदेह हलवण्यास सुरुवात केली असून, काही ठिकाणी रिकाम्या इमारतींचे तात्पुरत्या शवागरांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. नुवाकोट, धादिंग आणि नवलपरासी येथील शवागरांची क्षमता अपुरी पडू लागल्याने मृतदेह पोखरासह इतर जिल्ह्यांमध्ये पाठवले जात आहेत. मात्र पोखरातील रुग्णालयांवरही आता क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह ठेवण्याची वेळ आली आहे.
चितवनमध्ये २५० मृतदेहांसाठी तात्पुरते शवागरे
चितवनमध्ये रुग्णालयांच्या शवागरांमध्ये जागा अपुरी पडू लागल्याने भरतपूरमधील वापरात नसलेल्या एका इमारतीचे मृतदेह ठेवण्याचे तात्पुरत्या केंद्रात रूपांतर केले आहे. चितवनचे मुख्य जिल्हाधिकारी गणेश आर्याल यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील रुग्णालयांच्या शवागरांमध्ये केवळ ३० ते ५० मृतदेह ठेवता येतात. नव्या तात्पुरत्या केंद्रात सुमारे २५० मृतदेह ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जर ही जागा अपुरी पडल्यास देवघाट येथील विद्युत स्मशानभूमी वापरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भरतपूर महानगरपालिका या सुविधेची दुरुस्ती करून तेथे एअर कंडिशनर बसवणार असून, मृतदेह कुजण्याची प्रक्रिया मंदावण्यासाठी ड्राय आईसचा वापर केला जाणार आहे.
२ ते ६ अंश सेल्सिअस तापमानात मृतदेह ठेवले
पोखरा अकादमी ऑफ हेल्थ सायन्सेसचे माहिती अधिकारी सुशील आर्याल यांनी सांगितले की, सध्या मृतदेह २ ते ६ अंश सेल्सिअस तापमानात ठेवले जात आहेत. या तापमानात मृतदेह साधारण १० दिवस ते दोन आठवडे सुरक्षित ठेवता येऊ शकतात. मात्र त्यापेक्षा जास्त काळ साठवणूक करायची असल्यास शून्याखालील तापमान कायम ठेवणे आवश्यक आहे. पोखरामध्ये अशी व्यवस्था सध्या उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयाकडे बॉडी बॅग, संरक्षण साहित्य आणि शवविच्छेदनासाठी आवश्यक कर्मचारी पुरेशा प्रमाणात आहेत. मात्र ओळख न पटलेले मृतदेह सातत्याने सापडत राहिल्यास परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
पोखरामध्ये क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह
मृतदेहांची संख्या वाढत असल्याने पोखरातील शवागरेही भरू लागली आहेत. पुराचा मोठा फटका बसलेल्या तनाहुन, गोरखा, पूर्व नवलपरासी आणि धादिंग येथून आतापर्यंत ९३ मृतदेह पोखरात आणण्यात आले आहेत. कास्कीचे मुख्य जिल्हाधिकारी कुमार सिंह गुरूंग यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून ८८ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. पोखरा अकादमी ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये ७२ मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे.
“संख्येचा विचार केला तर आम्ही आधीच क्षमतेपेक्षा पुढे गेलो आहोत. सध्या मृतदेह ठेवण्याची व्यवस्था केली आहे. आणखी मृतदेह आल्यास जवळच्या जिल्ह्यांशी समन्वय साधावा लागेल,” असे गुरूंग यांनी सांगितले.
कावासोती येथील सामुदायिक वन-भवनाचेही तात्पुरत्या शवागृहात रूपांतर करण्यात आले आहे. मृतदेह जतन करण्यासाठी तेथे एअर कंडिशनर बसवण्यात आला आहे.

मृतांची ओळख पटवण्यासाठी क्युआर कोड
पुरात अनेक मृतदेहांची ओळख पटलेली नसल्याने त्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून मृतदेहांचे फोटो, बोटांचे ठसे आणि डीएनए नमुने घेतले जात आहेत. शवविच्छेदनही केले जात आहे. चेहऱ्यावरून ओळख पटू शकणाऱ्या मृतदेहांचे फोटो प्रसिद्ध करून कुटुंबीयांना त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास मदत केली जात आहे.
मृतदेह बराच काळ ठेवणे शक्य नसल्याने ओळख पटली नाही तर त्यांचे सुरक्षित ठिकाणी दफन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने जागा निश्चित केली जात आहे. प्रत्येक मृतदेहाला विशिष्ट टॅग क्रमांक दिला जाणार असून, त्याच्या दफनाची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे. डीएनए नमुने तपासणीसाठी काठमांडूला पाठवले जात आहेत.
याशिवाय मृतांची ओळख पटवण्यासाठी क्युआर कोड प्रणालीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात कुटुंबीयांना संबंधित मृतदेहाची माहिती शोधणे सोपे होण्याची अपेक्षा आहे.
