काठमांडू : नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानामुळे पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. पूरग्रस्त भागामध्ये सुमारे २० हजार घरांची पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे अधिकार्यांनी गुरुवारी सांगितले. त्रिशुली नदीच्या परिसरात आणि खोर्यामध्ये, तसेच अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात मालमत्तेची हानी झाली आहे.
दरम्यान, पुरानंतर नवव्या दिवशीही शोध, बचाव व मदत कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा १,२५९ झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. तसेच अजूनही ५,०८३ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. अपर त्रिशुली ३अ जलविद्युत केंद्र आणि अन्य जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या कर्मचार्यांपर्यंत पोहोचण्यासाठी गुरुवारी काहीशी प्रगती झाल्याचे दिसले.
नेपाळच्या ‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटी’चे (एनडीआरआरएमए) प्रमुख धर्मराज उप्रेती यांनी सांगितले की, ‘‘आमच्या अंदाजानुसार ७,५०० घरे पूर्ण नष्ट झाली आहेत, ती एकतर पुराच्या पाण्यात वाहून गेली किंवा ढिगारा व चिखलाखाली गाडली गेली.’’ त्याबरोबरच, पुराच्या पाण्यातून वाचलेली अनेक घरेही आता राहण्यासारखी राहिलेली नाहीत. त्यामुळे जवळपास २० हजार घरे अन्यत्र, सुरक्षित ठिकाणी बांधावी लागतील, असे उप्रेती म्हणाले.
तेराव्या दिवशी राष्ट्रीय शोकदिन! पंतप्रधान बालेन शहा यांच्या नेतृत्वाखालील नेपाळच्या मंत्रिमंडळाने पुराच्या १३व्या दिवशी, ७ सप्टेंबरला राष्ट्रीय शोकदिन जाहीर केला आहे. दुसरीकडे, अनेक स्थानिकांनी आपले बेपत्ता आप्तेष्ट जिवंत सापडण्याची आशा सोडून दिली असून त्यांचे प्रतीकात्मक अंत्यविधी केले आहेत. रसुवा, नुवाकोट, धडिंग, चितवन आणि नवलपारसी पूर्व या जिल्ह्यंमध्ये नेपाळी लष्कराचे ९.३००पेक्षा अधिक सैनिक बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहेत.
