Captain Priya Adhikari leads Nepal floods rescue operation: नेपाळमध्ये आलेल्या महापूरातून अजूनही देश सावरलेला नाही. या आपत्तीमुळे सुमारे १००० लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर अद्याप हजारो लोक बेपत्ता आहेत. विदेशातील शेकडो लोकांचा यात समावेश आहे. नेपाळचे सैन्य दल गेल्या आठवड्याभरापासून बचावकार्यात व्यस्त आहे. ४० वर्षीय हेलिकॉप्टर कॅप्टन प्रिया अधिकारी यांनी आठवड्याभरात १०० हून अधिक बचावकार्याच्या मोहिमा केल्या आहेत. सीएनएन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, आम्ही यापूर्वी अशी आपत्ती कधीही पाहिली नव्हती.

नेपाळमध्ये हिमस्खलन झाल्यानंतर आलेल्या महापुराचा तडाखा अनेक जिल्ह्यांना बसला. हजारो लोक बेपत्ता झाले. चिखलाखाली अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी सैन्य दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नेपाळच्या तिमुरे परिसराला महापुराचा सर्वाधिक तडाखा बसला. याठिकाणी प्रिया अधिकारी सध्या बचाव कार्यात व्यस्त आहेत.

सीएनएनचे अँडरसन कूपर यांच्याशी बोलताना प्रिया अधिकारी म्हणाल्या की, आमच्यापैकी अनेक हेलिकॉप्टर कॅप्टन कमालीचे थकले आहेत. तरीही आम्ही अविरत बचाव कार्य करत आहोत. आम्हाला याच साठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.

रसुवा जिल्ह्यातील तिमुरे गावात बचावकार्य करण्यासाठी जवळपास २० हेलिकॉप्टर्स एकाच वेळी काम करत आहेत. या गावात सर्वाधिक लोक बेपत्ता झाल्याचे सांगितले जाते. अधिकारी म्हणाल्या, सर्व वैमानिक सातत्याने एकमेकांशी रेडिओवरून संपर्कात असतात. काही वेळा पाच ते सहा हेलिकॉप्टर्स एकाच वेळी एके ठिकाणी लोकांना घेण्यासाठी उतरतात.

खाली उतरणे फार जिकरीचे काम असल्याचे प्रिया अधिकारी सांगतात. चिखलाने संपूर्ण परिसर व्यापला असल्यामुळे नेमके कोणत्या ठिकाणी उतरावे, याची निश्चिती करणे अवघड होते. त्यामुळे जमिनी लगत उतरून बचाव कार्य होईपर्यंत हेलिकॉप्टर चालूच ठेवावे लागते, असे त्या म्हणाल्या.

प्रिया अधिकारी म्हणाल्या, “तिमुरेहून उडताना खाली धक्कादायक चित्र दिसले. सर्वत्र मृतदेह विखुरलेले होते. पहिल्या दोन दिवसांत आम्ही २०० जणांना सुखरूप बाहेर काढले. सैन्य दलाचे ऑगस्टा हेलिकॉप्टर्सही या कामात उतरले होते. आम्ही खाली पाहतो, तेव्हा सर्व काही वाहून गेल्याचे दिसते. जलविद्युत प्रकल्प नष्ट झाले, लोक मरण पावले. तरीही जेव्हा आम्ही वाचलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढतो, तेव्हा त्यांच्याकडे पाहून नवी आशा निर्माण होते.”

कोण आहेत प्रिया अधिकारी?

पुरूषांची मक्तेदारी असलेल्या हवाई क्षेत्राची वाट प्रिया अधिकारी यांनी धरली आणि नेपाळमधील पहिल्या हेलिकॉप्टर कॅप्टन म्हणून प्रिया अधिकारी नियुक्त झाल्या. केबिन क्रू सदस्य बनण्यापूर्वी त्यांनी पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास केला होता.

हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रिया अधिकारी यांनी फिलिपिन्सला जाण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन होण्यासाठी निर्धारित तासांचे उड्डाण त्यांनी पूर्ण केले. २०१७ साली त्या पूर्णवेळ हेलिकॉप्टर पायलट बनल्या. ४० वर्षीय अधिकारी यांनी उंच ठिकाणांवर बचाव कार्य करण्यात प्राविण्य मिळवले आहे. हिमालयामध्ये त्यांनी अनेकदा शोध मोहीम आणि बचाव मोहिमा राबवल्या आहेत. माऊंट एव्हरेस्टमधून त्यांनी अनेकदा जखमी गिर्यारोहकांना वाचवले आहे.