Nepal Floods Rescue Operation : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण पुरामुळे आसाममधील नलबारीचा पंकज बर्मन याच्यावर मृत्यूशी झुंज देण्याची वेळ आली. नेपाळमधील एका वीज केंद्रात काम करणारा पंकज पुराचे पाणी आणि चिखलाचा लोंढा येताच सहकाऱ्यांसह जीव वाचवण्यासाठी डोंगरावर पळाला. तब्बल चार दिवस तो इतरांसोबत डोंगरमाथ्यावर अडकून राहिला. या काळात केवळ पाणी आणि बिस्किटांवर त्याने दिवस काढले.

‘पळ पंकज, पळ…’

पुराच्या आठवणी सांगताना पंकजने एनडीटीव्हीशी बोलताना त्या भीषण क्षणाचा थरारक अनुभव सांगितला. वीज केंद्राच्या परिसरात अचानक मोठा आवाज झाला आणि सर्व जण जीवाच्या आकांताने पळू लागले. त्याचवेळी एका सहकाऱ्याने पंकजला, ‘पळ पंकज, पळ’, असे ओरडून सावध केले. काही क्षणांतच पुराचे पाणी चिखल आणि मोठमोठे दगड घेऊन परिसरात शिरले. वाहने आणि इमारती पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना दिसत होत्या. परिस्थिती पाहून पंकज आणि इतरांनी तातडीने उंच भागाकडे धाव घेतली.

जीव वाचवण्यासाठी डोंगराचा आश्रय

रस्ते आणि आसपासचा परिसर पाण्याखाली गेल्याने पंकजसह अनेकांनी डोंगर चढण्याचा निर्णय घेतला. जवळपास शंभर जण या परिसरात अडकले होते. पुराचे पाणी वाढत असल्याने डोंगरमाथाच त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण ठरला. पंकजच्या म्हणण्यानुसार, तो आणि इतर सहकारी तब्बल चार दिवस डोंगरावर अडकून राहिले होते. अन्नाची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांनी फक्त पाणी आणि बिस्किटांवर दिवस काढले.

चार दिवसांनी सुटका

पुराचे पाणी ओसरल्यानंतर नेपाळी बचाव पथकांनी डोंगरावर अडकलेल्या लोकांची सुटका केली. त्यांना काठमांडू येथे नेण्यात आले. कंपनीने या कर्मचाऱ्यांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर आसाम सरकारच्या मदतीने पंकजसह काही जणांना मायदेशी परत आणण्यात आले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही काठमांडूतील हॉटेलमध्ये पंकजशी फोनवरून संवाद साधला. मायदेशी परतण्यासाठी मदत केल्याबद्दल पंकजने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

आठ जण परतले, मात्र मित्र अद्याप बेपत्ता

पंकज सुखरूप नलबारीत आपल्या कुटुंबीयांकडे परतला असला तरी त्याचा मित्र आणि सहकारी अरुण महंता अद्याप बेपत्ता आहे. पंकजने सांगितले की, अरुण २६ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता रात्रीची ड्युटी संपवून परतला होता. त्याने कुटुंबीयांना फोन करून थोडी झोप घेतल्यानंतर पुन्हा फोन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोघांनी एकत्र नाश्ता केला आणि पंकज कामावर निघून गेला. मात्र, त्यानंतर अरुणचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही.

अरुणच्या फोनवर संपर्क साधण्याचा पंकजने अनेकदा प्रयत्न केला, मात्र फोन लागला नाही. “आमच्यापैकी आठ जण परतले, पण अजून पाच जण बेपत्ता आहेत. मला सतत माझ्या मित्राचा विचार येतो,” असे सांगताना पंकज भावूक झाला.