Nepal Floods Survivor Recounts Horror : नेपाळमध्ये भीषण महापूर आल्यानंतर येथील जनजीवन विस्कळीत झालं. अनेकांचे सगेसोयरे या पूरात वाहून गेले असून अनेकजण बेपत्ता आहेत. विदेशी नागरिकांचाही यात समावेश आहे. त्यामुळे या महापूराची जगभर चर्चा सुरू आहे. दरम्यान, येथून अनेक करुण कहाण्याही समोर येत आहेत. रसुवा जिल्ह्यातील ५२ वर्षांचे शेतकरी श्यामलाल थापा आणि २९ वर्षीय अभियंता संतोष थापा यांनीही त्यांची अशीच करुण कहाणी इंडियन एक्स्प्रेसला सांगितली.
पत्नीचा हात घट्ट धरला पण…
श्यामलाल थापा यांची पत्नी या पूरात वाहून गेली, तर मुलगाही अद्याप बेपत्ता आहे. ते आणि त्यांची सून सध्या मदत छावणीत या दोघांच्याही परतीची वाट पाहत आहेत. याबाबत श्यामलाल थापा म्हणाले, “मी माझ्या पत्नीचा हात घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की मी तिला वाचवू शकलो नाही.”
… माझा मुलगा परत येईल
श्यामलाल पुढे म्हणतात, “माझा मुलगा जिवंत असेल यावर माझा विश्वास आहे. माझी सून तेव्हापासून एक शब्दही बोललेली नाही.” श्यामलाल सांगतात की, त्यांची पिढी या सीमावर्ती जिल्ह्यातील भाताच्या शेतांवरच जगत आली आहे. जेव्हा त्यांना विमानाने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले (एअरलिफ्ट केले), तेव्हा त्यांना सर्वत्र फक्त चिखल आणि ढिगाराच दिसत होता.
जणू सैतानच आकाशातून खाली उतरला होता
रसुवा जिल्ह्यातील गोसाइकुंडा नगरपालिकेत कार्यरत असलेले २९ वर्षीय अभियंता संतोष थापा म्हणाले की, त्या दिवशी ते उशिरा उठल्यामुळेच फक्त वाचले. पूर आला तेव्हा ते सकाळचा नाश्ता बनवत होते. त्यांना सुरुवातीला एका महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याचं आठवतंय. त्यांनी खिडकीबाहेर पाहिलं तेव्हा त्यांना पाण्याच्या भिंतीसारखी प्रचंड लाट त्यांच्या दिशेने येताना दिसली. “संपूर्ण आकाश काळंकुट्ट झालं होतं. जणू काही स्वतः सैतानच आकाशातून खाली उतरला होता”, ते म्हणाले. काही सेकंद ते जागेवरून हललेच नाहीत, तोपर्यंत एका मित्राने त्यांना ओढलं आणि ते दोघेही जमेल तितके दूर आणि उंचावर, जवळच्या टेकड्यांवर पळाले.
“मी पाच मिनिटे उशिरा उठलो म्हणूनच वाचलो, नाहीतर…” असं म्हणत ते शून्यात पाहू लागले. त्यांच्या निवासस्थानापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर असलेल्या नगरपालिका कार्यालयात आधीच पोहोचलेले त्यांचे दोन सहकारी नर बहादूर थापा आणि जे. सी. प्रकाश मात्र इतके नशीबवान नव्हते, असं ते सांगतात. बर्दिया जिल्ह्यातील १९ वर्षीय ओमप्रकाश थारू हे त्रिशुली-१ जलविद्युत प्रकल्पात रस्ता बांधणीच्या कामात व्यस्त होते, तेव्हा लोकांनी ओरडत पळायला सुरुवात केली.
“आम्ही इतरांपेक्षा उंचावर होतो, त्यामुळे आम्ही सुरक्षित होतो, तरीही आम्ही डोंगराच्या दिशेने धावलो”, त्यांनी सांगितलं. “जेव्हा मी मागे वळून पाण्याचा लोंढा पाहिला, तेव्हा मला माहीत होतं की खालच्या भागात काम करणारा कोणीही जिवंत राहणार नाही. मी नदीला अनेक लोकांना वाहून नेताना पाहिलं”, असं ते म्हणतात. थारू यांनी सांगितलं की, पूर ओसरल्यानंतर ते, त्यांचे काका आणि इतर काही कामगार डोंगरावरून खाली आले, पण लवकरच ते पुन्हा उंचावर धावले. विमानाने सुरक्षित बाहेर काढेपर्यंत ते तिथेच थांबून राहिले.
