नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयात आतापर्यंत शेकडो जणांचा बळी गेला आहे, तर २ हजार पेक्षा जास्त लोक अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा अजूनही शोध घेतला जात आहे. या महापुरामुळे अनेक गावं भुईसपाट झाले असून या पुरात अनेक इमारती, पूल कोसळले आहेत. पुराबरोबर आलेल्या माती आणि दगड-धोंड्यांमुळे मोठा विध्वंस झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नेपाळमधील या पुराच्या घटनेत त्रिशुली-३ ‘ए’ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अनेक कामगार अडल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्या अनुषंगाने त्रिशुली-३ ‘ए’ प्रकल्पाच्या बोगद्यात बेपत्ता कामगारांचा शोध घेतला जात होता. यासाठी नेपाळच्या सैन्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत होतं. या रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान तब्बल ९ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या २ जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आलं आहे.

या ‘रेस्क्यू ऑपरेशन’चा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. ९ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगाराने सुखरूप बाहेर आल्यानंतर त्यांच्या कठीण प्रसंगाचा थरारक अनुभव सांगताना एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘आपण सतत हरे कृष्णाचा जप करत होतो, त्यामुळे मला जगण्याचं बळ मिळालं’, असं म्हणत या कामगाराने आपल्याला दुसरं आयुष्य मिळाल्याची भावूक प्रतिक्रिया दिली.

व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?

नेपाळमधील पुराच्या घटनेनंतर ९ दिवसांनी त्रिशुली-३ ‘ए’ या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यामधून २ कामगारांना वाचवण्यात यश आलं. बचाव पथकाने या दोन कामगारांना शुक्रवारी सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. या घटनेला ९ दिवस उलटून गेल्यामुळे आता बोगद्यात कोणी जिवंत सापडेल ही आशा मावळली होती. पण असं असतानाच शुक्रवारी २ कामगारांची चमत्कारिकरीत्या सुटका करण्यात आली आहे.

‘हरे कृष्णाचा जप केला’

अभियंता संजय साह यांचा आणि कबीर महर्जन यांची सुटका करण्यात आली आहे. यावेळी संजय साह यांनी म्हटलं की, “हे आपल्याला एखाद्या दुसऱ्या आयुष्यासारखंच आहे. तसेच मृत्यू आणि जीवन यांच्यातील या अनिश्चित काळात आपण सतत ‘हरे कृष्णा’चा जप करत होतो”, अशी प्रतिक्रिया संजय साह यांनी दिली आहे.

दरम्यान, प्रकल्पाच्या ठिकाणी अडकलेल्यांना शोधण्यासाठी भारताच्या तज्ज्ञांचा समावेश असलेल्या बचाव पथकाने अथक प्रयत्न केल्यानंतर संजय व कबीर या दोन कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश आलं आहे. या बचावाच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून या थरारक दृश्यांमध्ये नेपाळी लष्कराचे जवान चिखलाने माखलेल्या अवस्थेतील वाचलेल्या कामगारांना बाहेर काढताना दिसत आहेत. संजय यांच्यासाठी ९ दिवसांचा हा कठीण काळ म्हणजे आशेचा किरण टिकवून ठेवण्याचा संघर्ष होता.