नेपाळच्या महाप्रलयात आत्तापर्यंत ५३८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती नेपाळ सरकारने दिली आहे. तसंच नेपाळ सरकारने असंही सांगितलं आहे की आत्तापर्यंत ११७ पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी ८५ पर्यटक हे भारतीय आहेत. नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे हाहाकार माजला आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार सातत्याने दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांच्या संपर्कात असून पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांची स्थिती आणि सुरक्षिततेची माहिती घेण्यात येत आहे. हिमस्खलनामुळे तिबेट व नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महापुरामुळे एकूण ५३८ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट करण्यात आलं आहे.

चीनमधील तिबेट सीमेलगतच्या प्रदेशात शुक्रवारी ५.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे तीव्र धक्का बसले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तिबेटच्या बाजूने असलेल्या धरणाला पुन्हा तडे जाऊन पाणी साचल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा थेट फटका नेपाळला बसला असून, त्रिशुली नदीच्या पाणीपातळीत अचानक मोठी वाढ झाली आहे.

संभाव्य धोका लक्षात घेता नेपाळ प्रशासनाने अलर्ट जारी करत त्रिशुली नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, नैऋत्य चीनच्या सिचुआन प्रांतातील लाँगचांग शहरात या ५.१ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली. या भूकंपानंतर सीमेलगतच्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात जमीन खचल्याचे आणि पाण्याचा प्रवाह बदलल्याचे वृत्त आहे.

नेपाळ पोलिसांचा हायअलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नेपाळ पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत सर्व आपत्कालीन यंत्रणा, बचाव पथके आणि स्थानिक नागरिकांना तातडीने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तिबेटच्या बाजूने धरणाचा विसर्ग किंवा बंधारा फुटल्याने त्रिशुली नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात असलेल्या सर्वांनी तात्काळ सुरक्षित स्थळी जावे, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

भीषण महापुरात आतापर्यंत ५३८ जणांचा मृत्यू

नेपाळच्या रसुवा जिल्हा आणि आसपासच्या परिसरात आलेल्या विनाशाकारी महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ५३८ वर पोहोचला आहे. तर १,५४५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

  • चितवन जिल्हा: सर्वाधिक १७८ जणांचा मृत्यू
  • काठमांडू पूर्व (NP East): ११० मृत्यू
  • गोरखा: ४४ मृत्यू
  • नुवाकोट: ३७ मृत्यू
  • धाडिंग: ३३ मृत्यू
  • तनहुन: २८ मृत्यू

याशिवाय, नेपाळमध्ये अजूनही ८२६ नागरिक बेपत्ता आहेत, तर तिबेटच्या भागात ५५८ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

परदेशी बचाव पथकांची मदत घेण्यास नेपाळचा नकार

नेपाळमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही, पंतप्रधान बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने परदेशी सैन्याची किंवा बचाव पथकांची मदत घेण्यास नकार दिला आहे. भारत, चीन, अमेरिका, ब्रिटन, जपान, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांनी मदत पथके पाठवण्याची तयारी दर्शवली होती.

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लोकबहादूर क्षेत्री यांनी सांगितले, “अशा संकटसमयी मित्रदेशांनी मदतीचा हात पुढे करणे स्वाभाविक आहे. मात्र, आमचे लष्कर, पोलीस आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणा या परिस्थितीत बचावकार्य करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. सध्या आम्हाला परदेशी बचाव पथकांची गरज वाटत नाही.”

नेपाळमध्ये महापूर का आला?

सुरुवातीला भूकंपाच्या धक्क्यांमुळे बर्फाच्या दरडी कोसळून पूर आल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, ‘यूएस जिओलॉजिकल सर्व्हे’ (USGS) ने स्पष्ट केले आहे की, हिमनदी (ग्लेशियर) अचानक कोसळल्याने आणि मोठ्या प्रमाणात गाळ व दगड धोंडे वाहून आल्याने नदीचा प्रवाह अडवला गेला. यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड दबावामुळे पाण्याचा अचानक मोठा स्फोट होऊन नेपाळ आणि तिबेटच्या सखल भागात विनाशकारी पूर आला.