Nepal Landslide : नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान २४ जणांचा मृत्यू, तर १४ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने या आपत्तीची भीषणता दाखवली आहे. व्हिडीओमध्ये डोंगराचा मोठा भाग अवघ्या काही सेकंदांत कोसळून काली गंडकी नदीत सामावून जाताना दिसत आहे. डोंगराचा भाग वेगाने खाली कोसळताच परिसरातील लोक घाबरून ओरडताना आणि सुरक्षित ठिकाणी धावताना ऐकू येत आहे.

तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने हाहाकार

गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका गंडकी प्रांतातील मनांग, म्याग्दी, बागलुंग, पर्वत आणि पाल्पा या भागांना बसला आहे. दक्षिणेकडील तराई भागातही अनेक ठिकाणी पाणी साचणे आणि जमिनीची धूप झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बागलुंगमध्ये १०, म्याग्दीमध्ये ६ आणि मनांगमध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. लुंबिनी प्रांतातील पाल्पामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला, तर धनुषा जिल्ह्यातील मिथिला नगरपालिकेत भूस्खलनात एकाचा मृत्यू झाला. या आपत्तीत १४ जण बेपत्ता आहेत. त्यापैकी मनांगमधील १०, म्याग्दीमधील ३ आणि बागलुंगमधील एका व्यक्तीचा समावेश आहे.

शेकडो घरं उद्ध्वस्त, हजारो नागरिक विस्थापित

पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात निवासी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अनेक घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून काही घरांचे नुकसान झाले आहे. गंडकी प्रांतात ४३५ कुटुंबांमधील सुमारे दीड हजार लोक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पर्वत जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असून १०६ घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे १६२ कुटुंबांतील सुमारे ५४० नागरिकांना घर सोडावे लागले.

पूल वाहून गेला, रस्ते संपर्क तुटला

काली गंडकी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. स्यांग्जा आणि गुल्मी जिल्ह्यांना जोडणारा काँक्रिटचा पूल आधीच खराब झाला होता. त्यानंतर वाढलेल्या नदीच्या प्रवाहात हा पूल पूर्णपणे वाहून गेला, त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमधील रस्ते संपर्क तुटला. गंडकी प्रांतात सहा पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून आणखी दोन पुलांचे नुकसान झाले आहे. तीन सरकारी कार्यालये पूर्णपणे आणि तीन कार्यालये अंशतः बाधित झाली आहेत.

हिमलुंग हिमालमध्ये हिमस्खलन; दोघांचा मृत्यू

अतिवृष्टीचा परिणाम डोंगराळ भागातील हिमालयीन क्षेत्रावरही झाला आहे. मनांग जिल्ह्यातील हिमलुंग हिमाल परिसरात हिमस्खलन झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. हे दोघे २२ सदस्यांच्या गिर्यारोहण मोहिमेचा भाग होते. या पथकात ९ गिर्यारोहक आणि १३ सपोर्ट स्टाफचा समावेश होता. पथकातील १० जणांनी फू गावातून संपर्क साधला असून आणखी १० जणांचा ठावठिकाणा समजू शकलेला नाही. बचावकार्यासाठी काठमांडूहून हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते, मात्र खराब हवामानामुळे रविवारी शोधमोहीम पुढे नेता आली नाही. सोमवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले.

वीज प्रकल्पांनाही मोठा फटका

पूरस्थितीचा परिणाम नेपाळच्या वीज पायाभूत सुविधांवरही झाला आहे. स्यांग्जामधील १४४ मेगावॅट क्षमतेच्या काली गंडकी ‘ए’ जलविद्युत प्रकल्पात नदीची पातळी वाढल्याने मिर्मी धरणाचे तिन्ही दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. त्यानंतर वीज निर्मिती थांबवण्यात आली. याशिवाय २२० केव्ही काली गंडकी कॉरिडॉरच्या ट्रान्समिशन लाइनवरील टॉवर २१ आणि २२ चेही नुकसान झाले आहे. कुश्मा-न्यू बुटवल ट्रान्समिशन लाइनमधील अडचणींमुळे सुमारे ३५८.२ मेगावॅट वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे.

दरम्यान, अनेक नद्या अजूनही दुथडी भरून वाहत असून बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिकांचा शोध, विस्थापित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवणे आणि नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.