नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी महाप्रलयाच्या संकटात भारत आणि चीन बाबत जे विधान केलं आहे ते चांगलंच चर्चेत आलं आहे. भारत आणि चीनसह नेपाळचे जे राजकीय हितसंबंध आहेत त्याबाबत शिशिर खनाल यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले की तुम्ही तुमच्या वडिलांना हे सांगू शकत नाही की आई बदलत आहोत आणि आईला हे सांगू शकत नाही की वडील बदलत आहोत. शिशिर खनाल यांनी दिलेलं हे उत्तर राजकीय मानलं जातं आहे.
नेमकं काय घडलं?
नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांना एका मुलाखतीत शेजारी राष्ट्रांबाबत अर्थातच भारत आणि चीनबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर शिशिर खनाल म्हणाले की आमचे दोन्ही देशांसह असलेले राजकीय आणि परराष्ट्रीय संबंध मजबूत आहेत. आम्ही आई वडील बदलू शकत नाही. आईला हे सांगू शकत नाही की वडील बदलत आहोत आणि वडिलांना हे सांगू शकत नाही की आई बदलत आहोत. आई वडिलांमध्ये निवड कशी करणार? असं म्हणत शिशिर खनाल यांनी या प्रश्नावर चाणाक्षपणे उत्तर दिलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शिशिर खनाल यांनी हे उत्तर दिलं आहे.
शिशिर खनाल भारत आणि चीन यांच्याबाबत आणखी काय म्हणाले?
नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल पुढे म्हणाले, भारत आणि चीन हे आमच्या देशाचे अत्यंत महत्वाचे शेजारी देश आहेत. दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत. इतिहास आणि संस्कृती या दोहोंनीही आम्ही दोन्ही देशांशी जोडले गेलो आहोत. नेपाळचं परराष्ट्र धोरण हेच आहे की परस्पर राष्ट्रीय हितसंबंध हे आणखी बळकट व्हावेत. त्यामुळे भारत आणि चीन यापैकी एका देशाचा पर्याय आम्ही निवडणार नाही. कारण आमचे दोन्ही देशांशी दृढ हितसंबंध आहेत. आम्ही आई आणि वडिलांमध्ये निवड कशी करणार? असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नेपाळमध्ये जो महाप्रलय झाला त्यामुळे ३९२ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
नेपाळ तिबेट सीमेवर महाप्रलय ३९२ जणांचा मृत्यू, १५०० लोक बेपत्ता
नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या विनाशकारी पुरामुळे २८८ भारतीय बेपत्ता असून २०० जण तिबेटमध्ये अडकल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली. भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार सातत्याने दोन्ही देशांच्या अधिकार्यांच्या संपर्कात असून पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांची स्थिती आणि सुरक्षिततेची माहिती घेण्यात येत आहे. हिमस्खलनामुळे तिबेट व नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महापुरामुळे एकूण ३९२ जणांचा मृत्यू झाला असून १५०० बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये पूल, रस्ते, जलविद्युत प्रकल्पांसह वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून हिमालयातील या देशात बचावकार्याला वेग आला आहे.
