रविवारी नेपाळमध्ये कोसळलेल्या तारा एअरलाइनच्या विमानाच्या अवशेषाचे काही फोटो समोर आले आहेत. मुस्तांग भागातील कोबान परिसरात विमानाचे अवशेष सापडले आहेत. या विमानाचा रविवारी अपघात झाला होता. तारा एअरलाइनची फ्लाइट ९ एनएईटी नेपाळमधील पोखरा येथून जोमसोमला जात होती. सकाळी १० च्या सुमारास हे विमान अचानक बेपत्ता झालं.

दिवसभर शोधमोहीम राबवल्यानंतर दुपारी ४ वाजता विमान कोसळल्याची पुष्टी करण्यात आली. या विमानात तीन क्रू मेंबर्ससह एकूण २२ जण होते. यामध्ये ४ प्रवासी भारतीय होते. तर जर्मनीचे २ आणि १३ प्रवाशी नेपाळ देशाचे होते. अपघातग्रस्त विमान ३० वर्षांहून अधिक जुनं असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रमुखांनी सांगितलं की, घटनास्थळी तपास सुरू आहे. नेपाळ लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी लष्कर हवाई मार्गाने घटनास्थळी पोहोचले आहेत. तातडीने बचावकार्य सुरू केलं आहे. खराब हवामान आणि ढगांच्या दाटीमुळे बचाव पथकांना अपघातग्रस्त विमानापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. बेपत्ता असलेल्या २२ प्रवाशांमध्ये ठाण्यातील वैभवी बांदेकर-त्रिपाठी, अशोक कुमार त्रिपाठी यांच्यासह त्यांची मुले धनुष (२२) आणि रितिका (१५) यांचा समावेश आहे.

त्रिपाठी-बांदेकर कुटुंब..
नेपाळ विमान दुर्घटनेत बेपत्ता झालेले अशोक कुमार त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर हे विभक्त दाम्पत्य धनुष आणि रितिका या त्यांच्या मुलांना वर्षांतून एकदा परदेश पर्यटनासाठी घेऊन जात असे. यंदा ते मुलांना घेऊन नेपाळला गेले होते. सध्या अशोक कुमार भुवनेशवरमध्ये तर, वैभवी ठाण्यात माजीवड्यातील रुस्तमजी इमारतीत वास्तव्यास आहेत. दोन्ही मुले वैभवी यांच्याबरोबर राहतात.

बचावकार्य करताना नेपाळ लष्कराचं हेलिकॉप्टर…

रविवारी झालेल्या दुर्घटनेनंतर खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. मात्र नेपाळ लष्कराच्या हेलिकॉप्टरने अपघातस्थळ शोधून काढलं आहे. माय रिपब्लिकाने दिलेल्या वृत्तानुसार, नेपाळ लष्कराचे १० सैनिक आणि दोन कर्मचाऱ्यांसह हेलिकॉप्टरने नरशंग मठजवळ नदीच्या काठावर उतरले, जे अपघाताचे संभाव्य ठिकाण होतं. याच परिसरात काही अंतरावर अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत.