Nepal Politics : नेपाळमध्ये एका महिन्याभरापूर्वी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत रॅपर बालेन शाह यांच्या पक्षाचा दणदणीत विजय झाला. या विजयानंतर ३५ वर्षीय बालेन शाह हे नेपाळचे पंतप्रधान झाले आहेत. नेपाळमधील प्रस्थापित पक्षांचा आणि दिग्गज नेत्यांचा बालेन शाह यांच्या पक्षाने दारूण पराभव केला. त्यामुळे बालेन शाह यांची जगभरात मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.
बालेन शाह यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतल्यापासून कामांचा धडाका लावला आहे. अवघ्या एका महिन्याभरात बालेन शाह यांच्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या धडाकेबाज निर्णयांची मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, सत्तेवर आल्याच्या अवघ्या एका महिन्यातच बालेन शाह यांच्या सरकारला हजारो तरुणांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. नेपाळमध्ये पुन्हा एकदा सरकारविरोधात निदर्शनं पाहायला मिळत आहेत.
पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारविरोधात संतापाची लाट का उसळत आहे? सरकारविरोधात हजारो नागरिक आणि तरुण निदर्शनं का करत आहेत? नेमकी कोणत्या निर्णयामुळे बालेन शाह यांच्या सरकारला रोषाला सामोरं जावं लागत आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बालेन शाह सरकारविरोधात नागरिक आंदोलन का करत आहेत?
बालेन शाह यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतल्याच्या अवघ्या महिन्याभरात त्यांच्या सरकारविरोधात नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. याचं कारण म्हणजे बालेन शाह यांच्या सरकारने भारतातून आयात होणाऱ्या १०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तूंवर सीमा शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा सीमावर्ती भागातील रहिवाशांना बसत आहे. सीमावर्ती भागातील रहिवाशांवर याचा मोठा परिणाम होत असल्याचा दावा केला जात आहे. याचं कारण म्हणजे सीमावर्ती भागातील नागरिक जीवनावश्यक वस्तूंसाठी सीमेपलीकडून होणाऱ्या खरेदीवर जास्त प्रमाणावर अवलंबून आहेत. त्यामुळे या आंदोलकांचं म्हणणं आहे की नेपाळ सरकारचा हा निर्णय त्यांच्यावर जास्त परिणाम करणारा आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
तरुणांमध्ये संतापाची लाट का उसळतेय?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारने नेपाळमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये असलेल्या सर्व राजकीय विद्यार्थी संघटनांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे बालेन शाह यांच्या सरकारच्या विरोधात तरुणांमध्ये संतापाची लाट उसळत असल्याचं दिसून येत आहे. सरकारने संवाद साधण्याऐवजी दडपशाही सुरू केल्याचा आरोप विद्यार्थी संघटनाच्या नेत्यांनी सरकारवर केला. त्यामुळे तरुणांमध्ये सरकारच्या विरोधात असंतोष वाढत असून देशभरात हजारो विद्यार्थी आंदोलनांमध्ये सामील झाले आहेत.

दरम्यान, तरुणांच्या आंदोलनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेच्या गणवेशात या आंदोलनात बसलेले दिसत आहेत. तसेच हातात फलक घेऊन हे विद्यार्थी सरकारच्या निर्णयांविरुद्ध घोषणाबाजी करत असल्याचं दिसत आहेत.
नेपाळच्या गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी का होतेय?
नेपाळचे गृहमंत्री सुदान गुरुंग यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याचा आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्यांवरून गृहमंत्री सुदान गुरुंग यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आंदोलनांची व्याप्ती वाढत असल्याने बालेन शाह सरकार समोरील आव्हान वाढण्याची शक्यता आहे. नेपाळचं आर्थिक धोरण, विद्यार्थ्यांमधील अशांतता आणि गृहमंत्री सुदान गुरुंग यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप हे मुद्दे बालेन शाह सरकार समोर अडचणीची ठरत आहेत.

बालेन शाह कोण आहेत?
बालेन शाह यांचा २७ एप्रिल १९९० रोजी नारादेवी, काठमांडू येथे जन्म झाला. शाह मधेशी समाजातून येतात. शाह यांच्या अडनावावरुन नेपाळमध्ये वादंग झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, जेन-झी आंदोलनानंतर बालेन यांचं नाव नेपाळमध्ये सर्वदूर पसरलं. बालेन शाह यांची मधेशी संबंध आणि मैथिला भाषा त्यांना फायद्याची ठरल्याचं राजकीय तज्ञ सांगतात. बालेन शाह यांनी महिन्याभरापूर्वीच नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. गेल्या वर्षी झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर सरकार कोसळल्यामुळे झालेल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या पक्षाने घवघवीत यश संपादन केलं. ३५ व्या वर्षी शपथ घेणारे बालेन शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत.
