Nepal Floods Rescue Updates: नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अजूनही हजारो लोक बेपत्ता आहेत. या नैसर्गिक आपत्तीनंतर भारत आणि चीनने केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान बालेन शाह यांनी दोन्ही देशांचे आभार व्यक्त केले आहेत. नेपाळच्या संसदेत बोलत असताना नेपाळने आंतरराष्ट्रीय मदतीला नकार दिला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यावेळी अशाप्रकारची आपत्ती कोसळले, तेव्हा मदत नाकारण्याचा प्रश्नच येत नाही.
बालेन शाह म्हणाले, आमचे मित्र राष्ट्र असलेल्या चीन आणि भारताने त्यांचे तंत्रज्ञ पाठवले. पहिल्या दिवसांपासून ते या समस्येवर लक्ष ठेवून होते. त्यांनी हवाई टेहळणी केली आणि नुकसानीचा आढावा घेतला. ज्या भागाला फटका बसला आहे, तिथे उतरणे शक्य आहे का? याची माहिती घेतली.
बालेन शाह पुढे म्हणाले, भारतीय तंत्रज्ञ शक्य तितक्या लवकर दुर्गम भागात पोहोचले. ही एक अपवादात्मक परिस्थिती होती. पूर आलेल्या ठिकाणी चिखल आणि गाळ साचला होता. तिथे उत्खनन यंत्रणा पोहोचणे तर अवघड होतेच, शिवाय लष्कर आणि सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांनाही उभे राहायला जागा नव्हती, असेही ते म्हणाले.
नेपाळच्या महापुरात सुमारे १,१२७ लोकांचा मृत्यू झाला असून अद्यापही हजारो लोक बेपत्ता आहेत, त्यानंतर नेपाळच्या पंतप्रधानांचे हे विधान समोर आले आहे. नेपाळच्या सशस्त्र दलाने आतापर्यंत ६,५४१ लोकांना वाचवले असून ४,८५८ लोक अजूनही बेपत्ता असल्याचे सांगितले जाते.
हवामान बदलामुळे आपत्ती ओढवल्याचा आरोप
बालेन शाह यांनी यापूर्वी सांगितले की, मागच्या आठवड्यात भोटेकोशी नदीत आलेल्या पुराचे पाणी रसुआ जिल्ह्यात शिरले. ही आपत्ती हवामान बदलामुळे ओढवली असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा घटना टाळण्यासाठी जागतिक आपत्ती प्रतिसादाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताकडून तात्काळ मदतीचा हात
नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर भारताने तात्काळ पावले उचलली. नेपाळला मोठ्या प्रमाणावर मानवतावादी आणि तांत्रिक मदत पुरविण्यात आली. या बचाव मोहिमेसाठी बोगदा बचावकार्य पथक, वैद्यकीय पथक आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथक पाठवण्यात आले. मृतांच्या डीएनएची तपासणी करून त्यांची ओळख पटविण्यात येत आहे.
भारताने मदतीच्या अनेक खेपा पाठवल्या असून ब्लँकेट, प्रथमोपचार कीट, सोलार लॅम्प आणि औषधांचा पुरवठा केला आहे.
