नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. या महापुरात शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे, तर अद्यापही शेकडो नागरिक बेपत्ता आहेत. त्यामुळे सध्या नेपाळवर मोठं नैसर्गिक संकट कोसळलं आहे. या महापुरानंतर अनेक गाव भुईसपाट झाले आहेत. नेपाळमधील या महापुराच्या घटनेचे काळजाचा थरकाप उडवणारे व्हिडीओ आता समोर येत आहेत. या महापुरामुळे नेपाळमध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं असून यातून आता पुन्हा उभं राहण्यासाठी नेपाळला खूप काळ लागू शकतो.
नेपाळमध्ये आलेल्या या विनाशकारी पुरामुळे शेकडो भारतीय देखील बेपत्ता आहेत, तर अनेकजण अडकल्याची माहिती समोर आली आहे. या महापुरानंतर सध्या नेपाळच्या सैन्यांकडून, पोलिसांकडून आणि बचाव यंत्रणांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. या महापुरानंतर मदत व बचावकार्याच्या मदतीसाठी भारत, चीन व अमेरिकेसह आणखी काही देशांनी तयारी दर्शवली होती. मात्र, नेपाळ सरकारने भारत, चीनसह विदेशी बचाव पथकांची मदत नाकारली आहे.
भारत, अमेरिका, चीन आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठवलेली विशेष बचाव पथकांची मदत घेण्यास नेपाळने नकार दिला आहे. आमचं (नेपाळचं) सैन्य व स्थानिक पोलीस दल हे या बचावकार्यासाठी सक्षम असल्याचा दावा नेपाळने केला आहे. त्यामुळे आम्हाला मदतीची आवश्यकता नसल्याचं नेपाळने स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, पुरामुळे बेपत्ता झालेल्या लोकांच्या शोधासाठी आणि बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर्स व प्रशिक्षित पथके पाठवण्याच्या भारत, चीन आणि इतर अनेक देशांच्या प्रस्तावांचा नेपाळने स्वीकार केलेला नाही. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या संदर्भात माहिती देताना म्हटलं की, आमची सुरक्षा यंत्रणा बचावकार्य करण्यास सक्षम आहे. बेपत्ता झालेल्या शेकडो परदेशी नागरिकांविषयीच्या माहितीसाठी समन्वय साधण्यासाठी आम्ही एक यंत्रणा उभारली आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये आलेल्या या भीषण महापुरानंतरही विदेशी बचावकार्याची मदत घेण्यास नेपाळने नकार का दिला? यावरून आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. मात्र, नेपाळच्या या निर्णयामागे अनेक कारणं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेपाळने काय म्हटलं?
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द काठमांडू पोस्ट’ला सांगितलं की, “विविध देश आणि संस्थांकडून आपापली पथके पाठवण्याची परवानगी मागणाऱ्या अनेक अधिकृत विनंत्या सरकारला प्राप्त झाल्या होत्या. मात्र, सरकारने त्यांना असं कळवलं आहे की नेपाळच्या स्वतःच्या सुरक्षा यंत्रणा हे अभियान हाताळण्यास सक्षम आहेत.”
