Nepal Jeep Accident 20 Dead: नेपाळमध्ये भीषण जीप अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जीप ७०० मीटर खोल दरीत कोसळून २० जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (३० एप्रिल) संध्याकाळी रोल्पाच्या जलजाला येथे हा अपघात झाला. “रुकुम ईस्टहून यात्रेकरूंना घेऊन जाणारी जीप थाबांग ग्रामीण नगरपालिकेच्या वॉर्ड एक येथे कड्यावरून जीप खाली कोसळली”, असे वृत्त ‘द काठमांडू पोस्ट’ने दिले आहे.

पावसामुळे अपघात झाल्याची शंका

पोलिस निरीक्षक सुनील थापा नेपाळी यांनी ‘द काठमांडू पोस्ट’ला दिलेल्या माहितीनुसार, “रोल्पा येथे अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचावपथक घटनास्थळी दाखल झाले असून, प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. उवा आणि थबांग येथील पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. जलजाला येथून प्रवाशांना घेऊन जीप निघाली होती. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने हा अपघात झाला असावा”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, जलजाला येथे धार्मिक कार्यक्रमाला जाण्यासाठी काही प्रवाशांनी एक खासगी जीप भाड्याने घेतली होती. कार्यक्रमाला जात असताना थाबांग ग्रामीण नगरपालिका परिसरात कड्यावरून ही जीप डोंगर कड्यावरुन खाली कोसळली. यात २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या जीपमधून कितीजण प्रवास करत होते याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. सध्या या भागात जोरदार पाऊस सुरु असल्याने बचावकार्यात अडथळा येत असल्याची माहिती पोलिसांनी स्थानिक वृत्तपत्राला दिली आहे.

बचावकार्य सुरु

पोलिसांनी स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आत्तापर्यंत २० प्रवशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जीपमधून किती प्रवासी प्रवास करत होते याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मुसळधार पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.