काठमांडू : नेपाळ आणि तिबेटमधील पूरग्रस्त भागांमध्ये साचलेला चिखल, खडक आणि पर्वतावरून खाली कोसळलेला ढिगारा यामधून मृतदेहांचा शोध घेण्याचे कठीण आव्हान दोन्ही बाजूंकडील शोध व बचाव पथकांसमोर आहे. आतापर्यंत नेपाळमध्ये १,०५० मृतदेह हाती लागले आहेत. तर तिबेटमध्ये हा आकडा १६ इतका आहे. तर दोन्ही बाजूंकडे मिळून सुमारे साडेचार हजार जण बेपत्ता आहेत.
पूर आलेल्या घटनेला एक आठवडा होत असताना नेपाळमध्ये अजूनही ३,९१६ जण बेपत्ता आहेत. त्यामध्ये ५८३ परदेशी नागरिक आणि ८३ सुरक्षा सैनिक आहेत. तिबेटमध्ये २६१ परदेशी नागरिकांसह ५४६ बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. बुधवारी हिमनदीचा मोठा भाग कोसळल्यानंतर त्याबरोबर प्रचंड प्रमाणात बर्फ, खडक, माती, चिखल भोटेकोशी नदीमध्ये कोसळला. पुराच्या पाण्यात हा गाळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शोध आणि बचावकार्य कठीण झाले आहे. त्यातच भूस्खलन आणि पुरामध्ये अनेक रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे दुर्गम भागांचा संपर्क तुटला आहे.
अस्थिर भूप्रदेश आणि ढिगारे यातून वाट काढणे बचाव पथकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. या पथकांचे सदस्य दुर्गम भागांमध्ये पोहोचल्यावर आणखी मृतदेह सापडतील आणि मृतांची संख्या वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तिबेटमध्ये चिखल खाली आल्याचा फटका
तिबेटच्या ग्यिरोंग पोर्ट सीमा येथे पर्वतावरून मोठ्या प्रमाणात चिखल खाली आल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. श्वानपथकांच्या मदतीने खडक आणि ढिगार्यांमधील जागेत शोध घेतला जात आहे. तर ग्यिरोंग पोर्टकडे जाणारा प्रमुख महामार्ग मोकळा करण्यासाठी अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. नेपाळकडे अशा साधनसामग्रीचा अभाव असल्यामुळे त्यांच्यासमोरील आव्हान अधिक वाढल्याचे दिसते.
बेपत्ता कर्मचार्यांपर्यंत पोहोचणे खडतर
पुरामुळे नुकसान झालेल्या १२ जलविद्युत प्रकल्पांमधील सुमारे ९०० कर्मचारी बेपत्ता असून, त्यांचा शोझ सुरू आहे. स्थानिक अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी जवळपास ५०० कर्मचारी प्रकल्पांसाठी खोदलेल्या भुयारांमध्ये अडकले असावेत. नेपाळ लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल राजाराम बसनेत यांनी सांगितले की, परदेशी तज्ज्ञांच्या मदतीने विविध प्रकल्पांच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. बोगद्यांमधील ढिगारे खोदण्याचे काम सुरू असून लष्कराचे सैनिक चिखलपाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. त्याशिवाय हेलिकॉप्टरही वापरले जात आहे.
ओळख न पटलेल्या मृतदेहांचे दफन
नेपाळ पोलिसांनी मंगळवारी काठमांडूमध्ये ओळख न पटलेल्या मृतदेहांचे सामूहिक दफन केले. यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. जंगल भागातील वेगवेगळ्या ठिकाणी हा दफनविधी पार पडला. त्याभोवती नंतर तारांचे कुंपण घालण्यात आले. अज्ञात मृतदेहांसाठी निळ्या रंगाचे क्रमांक देण्यात आले.
पुन्हा पुराची भीती कायम
नुवाकोट आणि रसुवा जिल्ह्यंमध्ये पुन्हा अचानक पूर येण्याची मोठी शक्यता असल्याचे नेपाळच्या ‘एनडीआरआरएमए’ने सांगितले. आतापर्यंत सुमारे १२,००० जणांची सुटका करण्यात आली असून रस्ते आणि पूल नष्ट झालेल्या भागांमध्ये पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर आणि अन्य हवाई वाहतुकीचा वापर केला जात आहे.
हवामान बदलामुळे हिमालय भागामध्ये आम्हाला असलेले धोके वाढत असल्याचे या घटनेतून दिसून आले. त्यामुळे या भागातील लोकांनी सतर्क राहायला हवे आणि त्याचवेळी हवामान बदलामुळे उद्भवणार्या संकटांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायापुढे उपस्थित केला पाहिजे. – बालेन शहा, पंतप्रधान, नेपाळ
