Nepal Tibet Flood Mukul Roy Daughter In Law Missing: नेपाळ आणि तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या भागात आलेल्या भीषण पूरात ३३० जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार शुभ्रांशु रॉय यांच्या पत्नीचाही समावेश आहे. शर्मिष्ठा भौमिक रॉय असे त्यांचे नाव असून, २५ ऑगस्टच्या रात्रीपासून त्यांचा पतीशी कोणताही संपर्क झालेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. शर्मिष्ठा रॉय उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

मुकुल रॉय यांच्या सूनबाई

शुभ्रांशु रॉय हे बीजपूरचे माजी तृणमूल आमदार तसेच माजी केंद्रीय रेल्वे मंत्री मुकुल रॉय यांचे सुपुत्र आहेत. शर्मिष्ठा रॉय या २१ ऑगस्ट रोजी एका ट्रॅव्हल एजन्सीमार्फत एकट्याच नेपाळला फिरण्यासाठी गेल्या होत्या.

कोलकाता येथील ३२ जणांचा ग्रुपही बेपत्ता

कैलाश मानसरोवर यात्रेसाठी निघालेला कोलकाता येथील ३२ जणांचा एक ग्रुपही बेपत्ता झाला आहे. या ग्रुपमध्ये ३० पर्यटक आणि २ टूर मॅनेजर्सचा समावेश आहे. हा ग्रुप २१ ऑगस्ट रोजी कोलकात्याहून रवाना झाला आणि दुसऱ्या दिवशी नेपाळमध्ये पोहोचला. बुधवारी सकाळी हा ग्रुप नेपाळ-तिबेट सीमेजवळील रसुवागढी येथे पोहोचला होता.

३३० जणांचा मृत्यू

पुरामुळे नेपाळमधील अनेक वस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून पूल उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच जलविद्युत प्रकल्पांसह अनेक पायाभूत सुविधांची मोठी हानी झाली आहे. पूरात आतापर्यंत सुमारे ३३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, २८८ भारतीयांसह ७५० पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. बुधवारी सकाळी ८:३७ वाजता तिबेट क्षेत्रात भूकंपाचा धक्का बसला आणि त्याच्या अवघ्या तीन मिनिटांनंतर अचानक पूर आल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या, असे नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल म्हणाले. भूकंपाच्या धक्क्यामुळे ग्लेशियर आऊटबर्स्ट होऊन अचानक पूर आला असावा, असे नेपाळी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.