नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरात ईशा फाउंडेशनच्या ७७ भाविकांचा गट अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, त्यांच्याशी मागील दोन दिवसांपासून कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. या घटनेमुळे ७७ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रशासनाकडून बचावकार्य वेगाने सुरू आहे.
कैलास मानसरोवर यात्रेवरून परतताना हा भीषण अपघात घडला. या घटनेवर ईशा फाउंडेशनच्या समन्वयक ‘मां गंभीरी’ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ७७ भाविकांमध्ये १९ वेगवेगळ्या देशांतील नागरिकांचा समावेश आहे.
आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव (सद्गुरू) यांच्या ‘ईशा फाउंडेशन’तर्फे दरवर्षी कैलास मानसरोवर यात्रेचे आयोजन केले जाते. भाविक काठमांडूहून नेपाळमार्गे तिबेटमध्ये जातात आणि त्याच मार्गाने परत येतात. बुधवारी हा गट कैलास यात्रेवरून नेपाळच्या दिशेने परत येत होता.
तिबेट-नेपाळ सीमेवरील ‘गिरांग’ या शहरातील इमिग्रेशन कार्यालयात भाविकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असतानाच भीषण महापूर आला. या महापुरात इमिग्रेशन इमारतीसह संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला.
“गेल्या दोन दिवसांपासून आमच्या ७७ भाविकांबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत, परंतु अद्याप भाविकांचा शोध लागलेला नाही. ७७ कुटुंबे अत्यंत चिंतेत असून हा त्यांच्यासाठी अत्यंत कठीण आणि भावुक काळ आहे,” असे मां गंभीरी यांनी स्पष्ट केले.
सद्गुरूंना ‘ग्राऊंड’वर जाण्याची परवानगी नाकारली
घटनेची माहिती मिळताच ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी स्वतः मदतकार्यात सहभागी होण्यासाठी नेपाळला जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव आणि तेथील बिकट परिस्थितीमुळे प्रशासनाकडून त्यांना जाण्याची परवानगी नाकारण्यात आली.
ईशा फाउंडेशनने भारत, चीन आणि नेपाळ येथील दूतावासांसह विविध सरकारी मंत्रालयांशी संपर्क साधला असून भाविकांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी मदत मागितली आहे.
१९ देशांतील भाविकांचा समावेश
बेपत्ता झालेल्या या ७७ भाविकांमध्ये जगभरातील नागरिकांचा समावेश आहे:
- अमेरिका: २२ नागरिक
- कॅनडा: १२ नागरिक
- ऑस्ट्रेलिया: ११ नागरिक
- ब्रिटन (UK): ९ नागरिक
- इतर देश: जर्मनी, फ्रान्स, नेपाळ, नेदरलँड्स, न्यूझीलंड, सिंगापूर, स्पेन, फिनलंड, हंगेरी, इस्रायल, लिथुआनिया, फिलीपिन्स, पोर्तुगाल, रशिया आणि दक्षिण आफ्रिका.
महापुरात नेपाळमध्ये ५७९ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू
हिमनदी फुटल्याने आलेल्या या विनाशकारी महापुरामुळे नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात प्रचंड वित्त आणि जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान ५७९ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणि पुरात वाहून गेलेल्या लोकांचा वेगाने शोध घेत आहेत.
