नेपाळ आणि तिबेटमध्ये या आठवड्यात झालेल्या भीषण पुरामागचे संभाव्य कारण आता समोर येत आहे. हिमालयातील एका उंच भागात हिमनदीच्या कोसळण्याचा क्षण ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर नदीचा प्रवाह काही काळ अडला आणि त्यानंतर पाणी व मातीच्या ढिगाऱ्याने खालच्या भागात अचानक धाव घेतल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
बीबीसी व्हेरिफायने या व्हिडिओची सत्यता तपासली असून, त्यात ७,२०० मीटरपेक्षा अधिक उंचीवर असलेल्या लांगटांग लिरुंग शिखराजवळ मोठ्या प्रमाणात दरड कोसळताना दिसत आहे. बर्फाच्छादित पर्वतांवरून धुळीचे प्रचंड लोट हवेत उठताना या फुटेजमध्ये दिसतात.
एबीसी न्यूजनुसार, एका चिनी छायाचित्रकाराच्या कॅमेरा ड्रोनमध्ये योगायोगाने हिमनदी कोसळल्यानंतरचे दृश्य कैद झाले. पुराचे पाणी ज्या दिशेने पुढे गेले, त्या दिशेशी व्हिडिओतील ठिकाण जुळत असल्याचे बीबीसी व्हेरिफायच्या तपासात आढळले आहे.
हिमनदी कोसळल्यानंतर महापूर कसा आला?
शास्त्रज्ञ अजूनही उपग्रह प्रतिमा, भूकंपीय माहिती आणि जमिनीवरील अभ्यासाचा वापर करून या घटनाक्रमाची जुळवाजुळव करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, बर्फ आणि खडकांचा मोठा ढिगारा ल्हेंदे नदीत कोसळल्याने नदीचा प्रवाह काही काळासाठी अडला असावा. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने एक तात्पुरता बांध तयार झाला. हा बांध तुटल्यानंतर मोठ्या वेगाने पाणी, बर्फ आणि मातीचा ढिगारा खाली वाहत गेला असावा. त्याचा फटका पुढे भोटेकोशी आणि त्रिशूली नदीला बसला.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सांगितले की, चीन आणि नेपाळमधील तज्ज्ञ तसेच संबंधित संस्थांच्या निष्कर्षानुसार, या आपत्तीमागे नेपाळमधील उंचावरील हिमनदी कोसळण्याची शक्यता आहे.
नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानेही बर्फ आणि खडकांचे हिमस्खलन हा प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानेही हिमनदी कोसळणे आणि त्यानंतर झालेल्या मलब्याच्या प्रवाहाकडे लक्ष वेधले आहे. सुरुवातीला या पुरामागे हिमनदीतील तलाव फुटणे किंवा हिमस्खलन कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता हिमनदी कोसळणे त्यानंतर नदीचा तात्पुरता प्रवाह थांबला जाणे नंतर अडथळा अचानक तुटणे आणि शेवटी पाणी आणि मलब्याचा प्रचंड प्रवाह अशी घटना अधिक संभाव्य मानली जात आहे.
बचावकार्य सुरू; मृतांचा आकडा वाढतच
या पुरामुळे नेपाळ-चीन सीमेच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. नेपाळमध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. तिबेटमध्येही मृत्यू आणि बेपत्ता व्यक्तींची संख्या मोठी आहे. बचाव पथके पूर्वी संपर्क तुटलेल्या भागांपर्यंत पोहोचत असल्याने आकडे सतत बदलत आहेत. पुराच्या तडाख्यात रस्ते, पूल आणि वीज प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. काठमांडूला तिबेटमधील ल्हासाशी जोडणाऱ्या मार्गावरही त्याचा परिणाम झाला आहे. हा मार्ग पर्यटक, ट्रेकर्स आणि कैलास-मानसरोवर यात्रेकरूंसाठी महत्त्वाचा आहे. नेपाळमध्ये आतापर्यंत ३,७०० हून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आल्याचे वृत्त आहे. बचाव आणि शोधमोहीमेसाठी हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पुरानंतर तयार झालेल्या तलावामुळे नवा धोका
आपत्तीचे संकट संपलेले नसतानाच आणखी एक धोका निर्माण झाला आहे. मलब्यामुळे नदीचा प्रवाह अडल्याने वरच्या भागात एक मोठा जलाशय तयार झाले असून त्यात लाखो घनमीटर पाणी साचले. रायटर्सच्या वृत्तानुसार, या तलावातील पाण्याचे प्रमाण २५ लाख घनमीटरपेक्षा जास्त झाले होते. जलाशयाचे पाणी ओसंडून भोटेकोशी नदीत मिसळू लागल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यात आले.
सुमारे ३२० भारतीयांशी संपर्क नाही
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, सुमारे ३२० भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. चिनी भागात अडकलेल्या ९६ भारतीयांनी जमिनीच्या मार्गाने नेपाळमध्ये प्रवेश केला असून, इतर प्रभावित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
