पश्चिम नेपाळमध्ये मोठय़ा प्रमाणावर दरडी कोसळल्यामुळे भारताच्या काही भागांतून वाहणाऱ्या एका नदीचा प्रवाह अडला आहे. यामुळे हजारो लोकांना सुरक्षिततेसाठी पळून जावे लागले असून आकस्मिक विनाशकारी पूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी रात्रभरात भूस्खलन झाल्यानंतर राजधानी काठमांडूच्या वायव्य दिशेला १४० किलोमीटर अंतरावर असलेल्या म्यागदी जिल्ह्य़ातून वाहणाऱ्या काली गंडकी नदीमध्ये एक खोल आणि वाढता नवा तलाव निर्माण झाला आहे. नदीचे पात्र अडल्यामुळे निर्माण झालेल्या कृत्रिम तलावाची पातळी दीडशे मीटरने वाढली असल्याचे नेपाळ पोलिसांनी सांगितले. या घटनेत अद्याप कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नसले, तरी या भागात सैन्य तैनात करण्यात आले आहे. सतत भूस्खलन होत असल्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने नदीकाठावरील वस्त्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.