जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारे नेपाळचे पहिले गिर्यारोहक आंग रीता शेर्पा यांचे निधन झाले आहे. रीता यांनी आपल्या आयुष्यामध्ये १० वेळा एव्हरेस्टचे शिखर सर केले. सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम बराच काळ त्यांच्या नावावर होता. या विक्रमासाठी २०१७ मध्ये गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचा समावेश झाला होता. रीता हे मागील बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांच्या मृत्यूनंतर आयोजित श्रद्धांजली सभेसाठी मोठ्या संख्येने गिर्यारोहक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. रीता यांच्या मृत्यूमुळे गिर्यारोहण करणाऱ्यांबरोबर नेपाळमधील एव्हरेस्ट प्रेमींनाही मोठा धक्का बसला असल्याची भावना या शोकसभेमध्ये सहभागी झालेल्यांनी व्यक्त केली. रीता यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं. मागील बऱ्याच काळापासून त्यांच्यावर मेंदूशी संबंधित आजारासंदर्भातील उपचार सुरु होते. त्यांना यकृताशी संबंधित समस्याही होत्या.

वयाच्या १५ व्या वर्षापासून रीता हे वाटाड्या म्हणून काम करत होते. रीता यांनी १० वेळा एव्हरेस्ट सर केला. विशेष म्हणजे यापैकी एकदाही त्यांनी ऑक्सिजन  सिलिंडरचा वापर केला नव्हता. त्यांचे सहकारी त्यांच्या याच क्षमतेमुळे त्यांना ‘स्नो लेपर्ड’ म्हणजेच बर्फाळ प्रदेशातील चित्ता या नावाने ओळखायचे. त्यांनी १९९३ साली पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केला. त्यानंतर पुढील तीन वर्षांमध्ये त्यांनी १० वेळा हा पराक्रम केला. काठमांडू येथील राहत्या घरीच रीता यांनी अखेरचा श्वास घेतला. नेपाळचे संस्कृतिक मंत्री योगेश भट्टराय यांनाही रीता यांच्या मृत्यूसंदर्भातील ट्विट केलं आहे.

नेपाळमधील गिर्यारोहण संघटनेचे माजी अध्यक्ष असणाऱ्या आंग तशेरिंग शेर्पा यांनी रीता यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. रीता हे गिर्यारोहकांसाठी हिरो होते. त्यांच्या मृत्यूमुळे देशाची आणि गिर्यारोहण करणाऱ्यांची मोठी हानी झाली आहे, असं तशेरिंग यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे. रीता यांच्यावर शेर्पा गोंबा या धार्मिक स्थळावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रीता यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे नेपाळमधील अनेक तरुण गिर्यारोहणाकडे वळले आणि यशस्वी झाले. शिर्पा समुदायातील अनेकजण एव्हरेस्ट चढण्यासाठी येणाऱ्यांसोबत वाटाडे म्हणून गिर्यारोहण करतात. या समुदायातील  कामी रिता शेर्पा यांनी तब्बल २४ वेळा एव्हरेस्ट सर केला आहे. नेपाळमधील शेर्पा लोक हे येथील गिर्यारोहणावर आधारित पर्यटनाचा आधारस्तंभ आहेत. कमी ऑक्सिजन असतानाही काम करण्याची क्षमता, उंच प्रदेशात राहण्याची सवय, गिर्यारोहकांचे साहित्य वाहून नेण्याची ताकद या गुणवैशिष्ट्यांमध्ये अनेक शेर्पांना रोजगार मिळाला आहे. आपल्या रोजगाराचा भाग म्हणून हे शेर्पा गिर्यारोहकांबरोबर एव्हरेस्ट शिखर सर करतात. १९५३ साली तेनझिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी या दोघांनी एव्हरेस्ट हिमशिखरावर पाऊल ठेवले. त्यानंतर येथे एव्हरेस्ट सर करण्याचा उद्योगच सुरु झाला. अगदी सरकारकडून देण्यात येणाऱ्या परवाण्यांपासून ते गिर्यारोहकांच्या राहण्या-खाण्याची सोय अशा अनेक माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळण्यात एव्हरेस्टबद्दल गिर्यारोहकांना असणाऱ्या आकर्षणाचा मोठा वाटा आहे.