Nestlé Baby Food FSSAI Action updates : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने नेस्ले इंडियाच्या शिशु पोषण उत्पादनांशी संबंधित कथित नियामक उल्लंघनांप्रकरणी तीन स्वतंत्र प्रकरणे सुरू केली आहेत. यापैकी दोन प्रकरणे नान एक्सेला प्रो. स्टेज १ आणि लॅक्टोजन प्रो १ या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये करण्यात आलेल्या प्रचारात्मक दाव्यांशी संबंधित आहेत. तिसरं प्रकरण नेस्लेच्या फॉलो-अप फॉर्म्युलाच्या एका नमुन्याशी संबंधित असून, या नमुन्यात बायोटिनचं प्रमाण निर्धारित मानकांनुसार नसल्याचं नियामकाला आढळलं. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील सविस्तर वृत्त दिलं आहे.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या उत्पादनांची आणि त्यांच्या प्रचारात्मक सामग्रीची तपासणी केल्यानंतर FSSAIने ही कारवाई केली. दोन शिशु फॉर्म्युला उत्पादनांवरील दाव्यांबाबत तसंच फॉलो-अप फॉर्म्युलाच्या पोषणमूल्यांबाबत नियामकाने आक्षेप नोंदवले आहेत.

FSSAIने काय आक्षेप घेतले?

नान एक्सेला प्रो. स्टेज १ संदर्भात FSSAIने व्हे प्रोटीन आणि पाच ह्युमन मिल्क ऑलिगोसॅकराइड्स (HMOs) यांच्याशी संबंधित दाव्यांवर आक्षेप घेतला. HMOs ही मानवी आईच्या दुधात नैसर्गिकरित्या आढळणारी जटिल साखरेची संयुगे आहेत.लॅक्टोजन प्रो १ बाबत व्हे प्रोटीनशी संबंधित एका दाव्यावर, त्याच्या पचनक्षमतेसह, FSSAIने चिंता व्यक्त केली आहे.

एका तज्ज्ञाने सांगितलं की, शिशु फॉर्म्युलाच्या प्रचारासंदर्भात यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्या होत्या; मात्र त्यापैकी सर्व प्रकरणांमध्ये नियामक कारवाई झाली नव्हती. ते म्हणाले, “नेस्ले ही शिशु फॉर्म्युलाची मोठ्या उत्पादकांपैकी एक कंपनी आहे. त्यामुळे या कारवाईमुळे इतर कंपन्यांनाही नियमांचं पालन करण्याचा संदेश जाईल.”

शिशु फॉर्म्युलाच्या जाहिरातींवर इतके कडक नियम का आहेत?

भारतात शिशु दूध पर्यायांच्या प्रचारावर अनेक दशकांपासून निर्बंध आहेत. IMS अॅक्ट म्हणजेच Infant Milk Substitutes, Feeding Bottles and Infant Foods (Regulation of Production, Supply and Distribution) Act, 1992, अशा उत्पादनांच्या जाहिराती आणि प्रचारावर विविध निर्बंध घालतो. या कायद्याचा उद्देश अशा विपणन पद्धतींना आळा घालणं हा आहे, ज्यामुळे स्तनपानाला बाधा येऊ शकते किंवा शिशु दूध पर्याय हे आईच्या दुधाइतकंच किंवा त्याहून अधिक चांगलं असल्याचा समज निर्माण होऊ शकतो. नेस्ले इंडियाविरोधातील कारवाईत FSSAIने अन्न सुरक्षा आणि मानांकन प्रक्रिया २०२० तसेच IMS Act या दोन्हींचा संदर्भ दिला आहे.

बायोटिनच्या प्रमाणाबाबत स्वतंत्र चिंता

तिसरे प्रकरण एका फॉलो-अप फॉर्म्युला उत्पादनाशी संबंधित आहे. हे उत्पादन सुरुवातीच्या शिशु फॉर्म्युलानंतर मोठ्या वयाच्या शिशू आणि बालकांसाठी वापरलं जातं. FSSAIने सांगितलं की, या उत्पादनाच्या एका नमुन्यात बायोटिनचं प्रमाण निर्धारित मानकांनुसार नसल्याचं आढळलं. बायोटिनला व्हिटॅमिन B7 असंही म्हटलं जातं. हे पाण्यात विरघळणारं जीवनसत्त्व असून शरीरातील विविध चयापचय प्रक्रियांमध्ये त्याची भूमिका असते. नियामकाने हा नमुना पुन्हा तपासणीसाठी पाठवला. संदर्भ प्रयोगशाळेनेही तो नमुना मानकांनुसार नसल्याचं आढळून आले. संबंधित कार्यवाहीत नमूद केलेल्या लागू मानकांनुसार, शिशु आहारामध्ये बायोटिनचं प्रमाण ७.५ ते ५० मायक्रोग्रॅम असणं आवश्यक आहे. या निष्कर्षानंतर नेस्ले इंडियाविरोधात स्वतंत्र प्रकरण सुरू करण्यात आले.

नेस्लेचं म्हणणे काय?

नेस्ले इंडियाने सांगितलं आहे की, त्यांची उत्पादने लागू असलेल्या नियमांचं पालन करतात. कंपनीने असंही म्हटलं आहे की, तपासणीखाली असलेल्या उत्पादनांच्या लेबलवरील दावे वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित करण्यात आले होते आणि FSSAIच्या तज्ज्ञ समितीने त्यांना मंजुरी दिली होती. कंपनीने नियामकाकडे सविस्तर उत्तरही सादर केलं आहे. कंपनीची ही भूमिका महत्त्वाची आहे, कारण FSSAIची कार्यवाही अद्याप नियामक प्रक्रियेच्या टप्प्यावर आहे. एखादे प्रकरण सुरू करण्यात आले आहे, याचा अर्थ अंतिमतः उल्लंघन सिद्ध झाले आहे किंवा कंपनीवर दंड ठोठावण्यात आला आहे, असा होत नाही.

ही छाननी महत्त्वाची का आहे?

शिशु फॉर्म्युला हा अन्न नियमनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील विषय आहे. कारण शिशूंच्या पोषणाशी तसंच स्तनपानाच्या पद्धतींशी त्याचा थेट संबंध आहे. शिशु पोषण उत्पादनांवर आणि त्यांच्या विपणनावर वाढत्या प्रमाणात लक्ष दिलं जात असतानाच ही ताजी कारवाई झाली आहे. स्विस स्वयंसेवी संस्था पब्लिक आयने २०२४ मध्ये केलेल्या एका तपासणीत असा दावा केला होता की, भारतासह काही कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या नेस्लेच्या काही शिशु फॉर्म्युला आणि बेबी-फूड उत्पादनांमध्ये साखरेचं प्रमाण युरोपमध्ये विकल्या जाणाऱ्या उत्पादनांपेक्षा वेगळं होतं. नेस्लेने यापूर्वीही आपली उत्पादने भारतातील लागू नियम आणि मानकांचे पालन करतात, अशी भूमिका मांडली आहे.

FSSAIने सुरू केलेली ही तीन प्रकरणे आता नियामक प्रक्रियेतून पुढे जातील. या प्रक्रियेच्या अंतिम निकालावर उल्लंघन सिद्ध होते की नाही आणि त्यानंतर कोणती कारवाई केली जाते किंवा केली जात नाही, हे निश्चित होईल.