नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावत हिने महात्मा गांधी आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावर टिप्पणी करून नवा वाद निर्माण केला आहे. स्वातंत्र्य लढय़ातील नेत्यांबद्दल अनादर दाखवणाऱ्या बेताल विधानांवर नेताजी बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी कंगनाला कानपिचक्या दिल्या. ‘महात्मा गांधी आणि माझे वडील नेताजी बोस हे दोघेही देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातील महान नायक होते’, असे मत अनिता बोस यांनी व्यक्त केले.कंगना राणावत हिने वृत्तपत्राच्या कात्रणाचा आधार घेत दावा केला की, नेताजी देशात परतले असते तर त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याची तयारी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महमद अली जिन्ना यांनी एका ब्रिटिश न्यायाधीशाकडे दाखवली होती.. भगत सिंह यांना फाशी दिली पाहिजे असेही गांधीजींचे मत होते व त्यासंबंधी पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा कंगनाने केला आहे. गांधीजी व नेताजी यांच्यावरील या दाव्यांना अनिता बोस यांनी कोणताही दुजोरा दिला नाही.

महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. नेताजींचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी असल्यामुळे नेताजींना आपल्या नियंत्रणात ठेवता येणार नाही, असे गांधीजींना वाटत होते. पण, हे लक्षात घेतले पाहिजे की, माझे वडील नेहमीच गांधीजींचे प्रशंसक राहिले. त्यांनी गांधीजींचा आदर केला. स्वातंत्र्य लढय़ासाठी आपण करत असलेल्या कामाबद्दल गांधींजी काय म्हणत आहेत, हे नेताजी नेहमी जाणून घेण्यास उत्सुक असत. गांधीजी आणि नेताजी यांचे उद्दिष्ट एकच होते पण, त्यांचे मार्ग वेगवेगळे होते. त्यांच्यातील या मतभेदात पंडित नेहरूंना कोणाची बाजू घ्यायची नव्हती. पण, नंतर नेहरू गांधीवादी समर्थकांमध्ये सामील झाले, असे अनित बोस यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

‘गांधीजी व नेताजींचे स्वातंत्र्य लढय़ातील कार्य एकमेकांना पूरक होते. फक्त अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळेल असे काँग्रेसवासींना वाटत होते पण, हे खरे नव्हते. नेताजी आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेचे योगदानही मोठे होते, असे स्वातंत्र्यानंतर उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या आधारे असे म्हणता येईल. असे असले तरी फक्त नेताजींमुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणेही चुकीचे ठरेल. कोणा एकामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. महात्मा गांधी यांनी देशातील लाखो लोकांना स्वातंत्र्य लढय़ात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले होते, अगदी नेताजींनाही!, असे अनिता बोस म्हणाल्या.

स्वातंत्र्य लढय़ाबाबत सरळ-सोपा विचार करणे योग्य नाही, असेही अनिता बोस म्हणाल्या.

भाजप प्रवक्त्याची कंगनावर टीका महात्मा गांधींच्या कार्यातून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रेरणा मिळते. देशवासीयांनी गांधीजींना ‘’राष्ट्रपिता’’ म्हटले. त्यांच्या विचारांमुळे भारतीयत्व टिकून आहे. वादग्रस्त विधाने करून कंगनाने भारताची जगभरात बदनामी केली आहे. कंगना म्हणजे बेताल विधानांची राणी आहे, अशी टीका भाजपच्या प्रवक्त्या निघत अब्बास यांनी केली आहे. यापूर्वी भाजपचे प्रवक्ता प्रवीण कपूर यांनीही कंगनावर कारवाई करण्याची मागणी केली होती.