गांधींनी कधीही नेताजींना पाठिंबा दिला नसल्याच्या कंगनाच्या वक्तव्यावर सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या….

महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही असा दावा कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केला आहे

Netaji Subhash Chandra Bose, Anita Bose, Kangana Ranaut, Mahatma Gandhi, Mumbai Mayor Kishori Pednekar, kangana ranaut, कंगना रणौत, कंगनाचं महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान, किशोरी पेडणेकरांची कंगनावर टीका
कंगनाने महात्मा गांधींसंबंधी केलेल्या वक्तव्यावर सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही असा दावा कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केला आहे. कंगनाच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनिता बोस यांनी इंडिया टुडेशी बोलताना महात्मा गांधी यांना आपण सुभाषचंद्र बोस यांच्यावर नियंत्रण ठेऊ शकत नाही असं वाटत असल्याने त्यांचे आणि माझ्या वडिलांमधील संबंध फार गुंतागुंतीचे होते असं म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपले वडील महात्मा गांधींचे प्रशंसक होते असंही स्पष्ट केलं आहे.

कंगनाचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, महात्मा गांधींवर साधला निशाणा; म्हणाली “सत्तेची हाव असणाऱ्यांनी…”

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ‘गांधी आणि इतर नेताजींना सोपवण्यास तयार झाले होते’ अशी या बातमीची हेडलाइन आहे. या रिपोर्टमध्ये महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरु तसंच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटीश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना सोपवण्यात येईल असा करार केल्याचा दावा आहे.

Kangana Ranaut Controversy: “कंगना ही राक्षसी वृत्तीची बाई; एकावर एक नीचपणाचा कळस करते”

यासंबंधी विचारण्यात आलं असता अनिता यांनी म्हटलं की, “दोघेही (नेताजी आणि गांधी) देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे मोठे नायक होते. एकाशिवाय दुसऱ्याला शक्य नव्हतं. काँग्रेसचे काही सदस्य गेल्या अनेक काळापासून अहिंसेमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा दावा करत असून तसं नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, नेताजी आणि इंडियन नॅशनल आर्मीचंही देशाच्या स्वातंत्र्यात योगदान आहे”.

“दुसरीकडे फक्त नेताजी आणि इंडियन नॅशनल आर्मीमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणणंही मूर्खपणाचं ठरेल. गांधी नेताजींसोबत अनेकांसाठी प्रेरणादायी होते,” असं यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं.

कंगनाने नेमकं काय म्हटलं आहे –

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ‘गांधी आणि इतर नेताजींना सोपवण्यास तयार झाले होते’ अशी या बातमीची हेडलाइन आहे. या रिपोर्टमध्ये महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरु तसंच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटीश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना सोपवण्यात येईल असा करार केल्याचा दावा आहे.

‘तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक, तुम्ही दोन्ही भूमिका घेऊ शकत नाही. निवडा आणि निर्णय घ्या’ असं या बातमीवर लिहिण्यात आलं आहे.

स्वातंत्र्यसैनिकांना त्या लोकांनी ब्रिटीशांच्या हवाली केलं ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नव्हती, मात्र सत्तेची भूक होती असंही कंगनाने म्हटलं आहे. पुढे बोलताना कंगनाने महात्मा गांधींवर निशाणा साधत म्हटलं आहे की, “हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. आपले हिरो हुशारीने निवडा”.

“महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी व्हावी अशी महात्मा गांधींची इच्छा होती असे काही पुरावे दर्शवतात. त्यामुळे तुम्ही तुमचे हिरो योग्यपणे निवडले पाहिजे. कारण या सर्वांना तुमच्या आठवणींच्या एकाच बॉक्समध्ये ठेवणं आणि प्रत्येक वर्षी जयंतीला शुभेच्छा देणं पुरेसं नसून खरंतर मूर्खपणा, बेजबाबदारपणा आहे. प्रत्येकाला आपला इतिहास आणि आपले हिरो माहिती असायला हवेत”, असंही कंगनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

याआधी कोणत्या वक्तव्यामुळे वाद झाला होता –

कंगनाने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना भारताला १८९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती असं सांगत खरं स्वातंत्र्य नरेंद्र मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर मिळाल्याचं म्हटलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून कंगनाच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Netaji subhash chandra boses daughter anita kangana ranaut mahatma gandhi sgy