पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी ममता बॅनर्जी यांच्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ‘वैयक्तिक कारणांमुळे’ हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी त्यांच्या या निर्णयामुळे बंगालच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

काही काळापूर्वीच भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये जाणे ही आपली ‘चूक’ होती, अशी जाहीर कबुली त्यांनी त्या वेळी दिली होती. मात्र, आता तृणमूल काँग्रेसलाही त्यांनी रामराम ठोकल्याने चंद्र कुमार बोस यांची पुढील राजकीय दिशा काय असणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

राजीनामा पत्रात काय म्हटले आहे?

तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला पाठवलेल्या पत्रात त्यांनी लिहिले आहे, “मी वैयक्तिक कारणांमुळे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे.”

चंद्र कुमार बोस यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयावर तृणमूल काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सर्वसमावेशक राजकारणाचा पुरस्कार करत त्यांनी पक्षाचे काम सुरू केले होते; मात्र काही काळातच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला.

भाजप सोडताना केले होते गंभीर आरोप

चंद्र कुमार बोस यांनी २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने त्यांच्यावर पश्चिम बंगाल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी भाजपच्या तिकिटावर २०१६ ची विधानसभा आणि २०१९ ची लोकसभा निवडणूकही लढवली होती. मात्र, २०२० मध्ये झालेल्या संघटनात्मक बदलांमध्ये त्यांना या पदावरून हटवण्यात आले.

यानंतर २०२३ मध्ये त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. “नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सर्वसमावेशक विचारसरणीचा प्रसार करण्याचे आश्वासन भाजपने पाळले नाही,” असा थेट आरोप त्यांनी पक्षातून बाहेर पडताना केला होता.

कोण आहेत चंद्र कुमार बोस?

चंद्र कुमार बोस हे देशातील एका अत्यंत प्रतिष्ठित घराण्याचे वंशज आहेत:

  • कुटुंबाची पार्श्वभूमी: ते प्रसिध्द स्वातंत्र्यसेनानी आणि बॅरिस्टर शरदचंद्र बोस यांचे नातू तसेच प्रसिद्ध वकील व माजी खासदार अमिया नाथ बोस यांचे सुपुत्र आहेत. शरदचंद्र बोस हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मोठे बंधू होते. या नात्याने चंद्र कुमार बोस हे नेताजींचे ‘ग्रँडनेफ्यू’ आहेत.
  • शिक्षण आणि कॉर्पोरेट करिअर: राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती. लंडनच्या हेंडन कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी आणि आयआयएम कलकत्ता येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी तब्बल १८ वर्षे ‘टाटा स्टील’मध्ये उच्च पदावर काम केले.
  • उद्योग आणि सामाजिक कार्य: २००४ मध्ये त्यांनी मनुष्यबळ विकास आणि कौशल्य विकासाशी संबंधित स्वतःची कंपनी स्थापन केली.
  • नेताजींच्या फायली सार्वजनिक करण्यासाठी लढा: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित गोपनीय फायली सार्वजनिक कराव्यात, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘ओपन प्लॅटफॉर्म फॉर नेताजी’ या मोहिमेचे प्रवक्ते म्हणून त्यांनी मोठे आंदोलन उभारले होते.