Netanyahu Counters JD Vance : “सध्याच्या घडीला इस्रायल देशाबद्दल फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सहानुभूती आहे. मी जर इस्रायली मंत्रिमंडळात असतो तर इस्रायलचा एकमेव राहिलेला शक्तिशाली मित्रावर मी कधीच टीका केली नसती”, असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्स यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी भारताचा उल्लेख केला. इस्रायलला भारतात प्रचंड पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत नेतान्याहू म्हणाले, “आमचे इतरही काही मित्र आहेत, जसे की भारत नावाचा एक छोटासा देश, तुम्हाला माहितीच आहे, तिथे १.४ अब्ज लोकसंख्या आहे आणि तिथे आम्हाला प्रचंड पाठिंबा आहे.” इस्रायलला भारतातून फेसबुकवरही मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचा उल्लेख इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला. नेतन्याहू म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे, माझे फेसबुकवर अकाऊंट आहे आणि तिथे मला प्रचंड पाठिंबा मिळतो. माझे इतरही अनेक समर्थक असू शकतात.”

भारत आणि इस्रायलमध्ये सलोख्याचे संबंध

भारत आणि इस्रायलमध्ये चांगले संबंध आहेत, तसंच नेतान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातही सलोख्याचे संबंध आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला इस्रायलच्या पंतप्रधानांनी त्यांच्या भारतीय समकक्षांचा वैयक्तिक मित्र म्हणून उल्लेख केला होता आणि भारताला जागतिक महासत्ता म्हटलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये इस्रायलचा अधिकृत दौरा केला होता आणि भारत इस्रायलसोबत पूर्ण विश्वासाने ठामपणे उभा असल्याचं म्हटलं होतं. या दौऱ्यानंतर दोनच दिवसांनी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर अचानक हल्ला केला होता. त्याचं नंतर पूर्ण युद्धात रूपांतर झालं.

अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी एकत्र येत इराणवर हल्ले केले होते. या दोन्ही देशांनी इराणला बेचिराख करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तीन देशांतील युद्धाचा फटका जगातील इतर देशांना झाल्याने हे युद्ध थांबवण्याचं आवाहन अनेक देशांनी केलं. परिणामी अमेरिकेने इराणबरोबर युद्धबंदीचा करार केला. मात्र, या कराराला इस्रायलचा विरोध होता. त्यामुळे इस्रायलमधून अमेरिकेविरोधात संताप व्यक्त केला गेला. यातूनच जे.डी वान्स यांनी इस्रायलला फटकारलं होतं. त्यावरून आता इस्रयालनेही अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिलं.