इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर इराणवर अणुहल्ला करण्यासाठी जोरदार दबाव आणत आहेत, असा दावा अमेरिकेतील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार टी. कार्लसन यांनी केला आहे. अमेरिकेकडून येत्या काही दिवसांतच अणुबॉम्ब वापरण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा धक्कादायक दावाही त्यांनी केला आहे. कार्लसन यांच्या या दाव्यामुळे जागतिक राजकारणात आणि विशेषतः मध्य पूर्वेत तीव्र खळबळ उडाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
पिकॅक्स पर्वताला लक्ष्य करण्याची योजना?
कार्लसन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका विस्तृत पोस्टद्वारे हा खळबळजनक दावा केला. त्यांच्या दाव्यानुसार, मध्य इराणमधील ‘पिकॅक्स माउंटन’ हे या संभाव्य अणुहल्ल्याचे मुख्य लक्ष्य असू शकते. या पर्वताखालील भुयारांमध्ये इराणने आपला अणुऊर्जा आणि युरेनियम संवर्धनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू केल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे.
पर्वताचा भाग कठीण ग्रेनाइट दगडांचा असल्याने अमेरिकेची पारंपारिक शस्त्रे किंवा साधे बॉम्ब या भुयारांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळेच तिथे अणुहल्ला करण्याशिवाय पर्याय नसल्याचे गणिते मांडली जात आहेत, असे कार्लसन यांनी नमूद केले. “नेतान्याहू यांच्या सततच्या दबावामुळे ट्रम्प प्रशासन येत्या काही दिवसांत इराणवर अणुहल्ल्याचा निर्णय घेऊ शकते,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. याशिवाय, एका अज्ञात सूत्राच्या हवाल्याने त्यांनी पुढे सांगितले की, “नेतान्याहू या मुद्द्यावर दररोज ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा करत आहेत.”
सत्ता टिकवण्यासाठी नेतान्याहूंचा युद्धाचा हट्ट?
इराणवरील लष्करी कारवाईच्या या मागणीमागे नेतान्याहू यांचे वैयक्तिक आणि राजकीय हितसंबंध असल्याचे कार्लसन यांचे म्हणणे आहे. इस्रायलमधील नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर ट्रम्प यांच्या थेट हस्तक्षेपाशिवाय नेतान्याहू यांना सरकार स्थापन करणे कठीण जात आहे. सत्ता गमावल्यास त्यांना भ्रष्टाचाराच्या चौकशीला आणि तुरुंगवासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे “नेतान्याहू यांना राजकीय अस्तित्वासाठी हे युद्ध चालू ठेवणे गरजेचे आहे,” असा दावा कार्लसन यांनी केला.
कार्लसन यांच्या मते, अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ, सेंटकॉमचे कमांडर ब्रॅड कूपर, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि ‘सीआयए’ प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांसारखे अमेरिकेतील अनेक वरिष्ठ अधिकारी नेतान्याहू यांच्या या आक्रमक भूमिकेला पाठिंबा देत आहेत.
तसेच, नेतान्याहू यांनी २७ सप्टेंबर रोजी अबु धाबीची गुप्त भेट घेऊन संयुक्त अरब अमिरातीकडून इराणविरोधातील या अंतिम लष्करी कारवाईसाठी पाठिंबा मागितला होता, परंतु युएईने त्याला स्पष्ट नकार दिला, असा दावाही कार्लसन यांनी केला आहे.
जागतिक अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावर गंभीर परिणामांचा इशारा
या संभाव्य अणुहल्ल्याचे किंवा युद्धाच्या भडक्याचे जागतिक स्तरावर अत्यंत विनाशकारी परिणाम होतील, असा इशारा कार्लसन यांनी दिला आहे.
- होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे जागतिक ऊर्जा आणि खत बाजाराला मोठा फटका बसू शकतो. ऑक्टोबर महिन्यातच जगातील सुमारे ८५० सुपरटँकर्सपैकी ११ जहाजांचे मोठे नुकसान झाले आहे.
- पिकॅक्स पर्वतावर भूगर्भीय अणुस्फोट झाल्यास पर्शियन आखातातील पाणी दूषित होऊ शकते. यामुळे सुमारे १० कोटी लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल.
- अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर केल्यास जगात एक धोकादायक पायंडा पडेल. अमेरिकेने इराणवर अणुहल्ला केल्यास रशियालाही युक्रेनविरुद्ध अणुबॉम्ब वापरण्याचे मोकळे रान मिळेल, असा इशारा रशियाने आधीच दोन देशांना दिला असल्याचे कार्लसन म्हणाले.
कार्लसन यांच्या या दाव्यांवर अमेरिका किंवा इस्रायल सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, तसेच कार्लसन यांनीही आपल्या दाव्यांच्या पुष्टीसाठी कोणताही स्वतंत्र पुरावा सादर केलेला नाही. मात्र, या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय राजकारणातील तणाव कमालीचा वाढवला आहे.
